पुढील संकल्पना स्पष्ट करा:
१. द्वंद्ववाद
१. जॉर्ज हेगेल यांनी द्वंद्ववाद पद्धतीचा सिद्धांत मांडला.
२. कोणत्याही एखाद्या घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी दोन विरोधी प्रकारांत करावी लागते. त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचे आकलन होत नाही. या पद्धतीला ‘द्वंद्ववाद’ (डायलेक्टिक्स्) असे म्हटले जाते.
३. या पद्धतीत प्रथम एक सिद्धान्त मांडला जातो. त्यानंतर त्या सिद्धान्ताला छेद देणारा प्रतिसिद्धान्त मांडला जातो.
४. या पद्धती मध्ये परस्पर विरोधी दोन
सिद्धांत माडले जातात त्या दोन्ही सिद्धान्तांच्या तर्काधिष्ठित ऊहापोहानंतर त्या दोहोंचे सार ज्यात सामावलेले आहे अशा सिद्धान्ताची समन्वयात्मक मांडणी केली जाते.
५. उदाहरणार्थ; खरे-खोटे, चांगले-वाईट.
२. अॅनल्स प्रणाली
१. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये अॅनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहासलेखनाची प्रणाली उदयाला आली.
२. इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते आणि त्या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्धे यांच्यावर केंद्रित न करता तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांसारख्या विषयांचा अभ्यास करणेही महत्त्वाचे मानले जाऊ लागले.
३.अॅनल्स प्रणालीमुळे इतिहासलेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली.
३. उपयोजित इतिहास
१. भूतकाळातील घटनांसंबंधींचे जे ज्ञान इतिहासाद्वारे प्राप्त होते, त्याचा उपयोग वर्तमान आणि भविष्यकाळात सर्व लोकांना कसा होईल, याचा विचार उपयोजित इतिहास या विषयाद्वारे केला जातो.
२. वर्तमानातील सामाजिक आव्हानांवर उपाययोजना करणे, सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय घेणे यांसारख्या गोष्टींसाठी पूर्वी होऊन गेलेल्या घटनांचे विश्लेषण दिशादर्शक ठरते. उपयोजित इतिहास उपयुक्त असतो.
४. प्राच्यवादी इतिहासलेखन
१. युरोपमधील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल जागृत झालेले होते. त्या कुतूहलापोटी भारतीय संस्कृती अभ्यास करणाऱ्या युरोपीय अभ्यासकांना प्राच्यवादी म्हटले.
२. या प्राच्यवादी अभ्यासकांनी भारतीय संस्कृती, इतिहास, भारतीय भाषा व धर्म यांचा अभ्यास करून इतिहास लेखन केले.
३. प्राच्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपीय भाषांमधील साधर्म्याचा अभ्यास केला. या भाषांची जननी असणारी एक प्राचीन इंडो-युरोपीय भाषा होती, अशी कल्पना मांडली गेली.
४. प्राच्यविद्यावंतांच्या लेखनामागील छुपे साम्राज्यवादी वृत्ती होती त्यादृष्टीने त्यांनी भारताच्या इतिहासाचे लेखन केले.
५. राष्ट्रवादी इतिहासलेखन
१. एकोणिसाव्या शतकामध्ये इंग्रजी शिक्षणपद्धती मध्ये शिकून तयार झालेल्या भारतीय इतिहासकारांच्या लेखनामध्ये भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान आणि भारतीयांची आत्मजाणीव जागृत करण्याकडे असलेला कल दिसतो. त्यांच्या लेखनास राष्ट्रवादी इतिहासलेखन असे म्हटले जाते.
२. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या प्राचीन भारताच्या पूर्वग्रहदूषित इतिहासाला त्यांनी विरोध केला.
३. राष्ट्रवादी लेखन करणाऱ्या इतिहासकारांनी भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधण्याचा प्रयत्न केला.
४. भारतीयांनी ब्रिटिशांविरुद्ध दिलेल्या स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रवादी इतिहासलेखनाचा उपयोग झाला.
५. राष्ट्रवादी इतिहासलेखनाच्या प्रभावामुळे प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली.
६. दक्षिण भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांकडे आणि इतिहासाकडे इतिहासकारांचे स्वतंत्रपणे लक्ष वेधले गेले.
६. वंचितांचा इतिहास (सबऑल्टर्न):
१. वंचित समूहांचा इतिहास लिहिण्याची सुरुवात मार्क्सवादी इतिहासलेखनाच्या परंपरेतूनच झाली.
२. इतिहासलेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासून करायला पाहिजे, ही कल्पना इटालियन अँटोनिओ ग्रामची याने मांडली.
३. वंचितांचा इतिहास लिहिण्यासाठी लोकपरंपरा ह एक महत्त्वाचे साधन मानले गेले आहे.
४. वंचितांच्या
इतिहासाला एक महत्त्वाची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचे महत्त्वाचे कार्य रणजित गुहा या भारतीय इतिहासकाराने केले.
५. महात्मा फुले यांनी ‘गुलामगिरी’ या पुस्तकात शूद्रातिशूद्रांचा इतिहास नव्याने उलगडून दाखवला.
६. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या विपुल लेखनापैकी ‘हू वेअर द शूद्राज’ आणि ‘द अनटचेबल्स्’ हे ग्रंथ वंचितांच्या इतिहासाचे उदाहरण म्हणून सांगता येतात.
७. नैसर्गिक वारसा:
१. निसर्गातील जैववैविध्याचा विचार नैसर्गिक वारसाच्या संकल्पनेत केलेला आहे.
२. नैसर्गिक वारसामध्ये प्राणी, वनस्पतीसृष्टी, त्यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणाऱ्या परिसंस्था आणि भूरचनात्मक वैशिष्ट्ये गोष्टींचा समावेश होतो.
३. भारतातील नैसर्गिक स्थळे अभयारण्य, उद्याने, पर्वतरांगा, नद्या, खोरी, तलाव, धरणे व
समुद्र किनारे हा नैसर्गिक वारा आहे.
४. उदाहरण: पश्चिम घाट, सातारा जिल्ह्यातील कास
पठार.
८. वेब
पत्रकारिता
१. आधुनिक काळात संगणक व
महाजाल यांचा उपयोग पत्रकारिता क्षेत्रात केला जातो, या
माध्यमातून केल्या जाणाऱ्या पत्रकारितेस ‘वेब
पत्रकारिता’ असे
म्हणतात.
२. अत्याधुनिक नियतकालिकांमध्ये ‘वेब पत्रकारिता’ प्रकारात प्रसिद्ध होणाऱ्य नियतकालिकांचा समावेश होतो.
३. वेब न्यूज पोर्टल्स, सोशल मिडिया, वेब चॅनेल्स, यू ट्यूब यांवर इंग्रजी आणि भारतीय भाषांमधून वाचक आणि प्रेक्षकांसाठी मजकूर उपलब्ध करून दिला जातो.
४. वेब पत्रिका व सोशल मीडिया यांमार्फत पुरवली जाणारी बातमी व माहिती तपासून खात्री करून घेणे आवश्यक आहे.
९. वारसा मुशाफिरी
१. ऐतिहासिक वारसास्थळाला भेट देण्यासाठी जाणे याला ‘हेरिटेज वॉक’ असे म्हणतात.
२. जेथे इतिहास घडला तेथे प्रत्यक्ष जाऊन इतिहास जाणून घेणे ही अनुभूती हेरिटेज वॉकमध्ये येते.
३. ऐतिहासिक वास्तू जतन करणे, त्याची माहिती जमवणे आणि ती जगभर विविध माध्यमातून पोहचणे इत्यादी उपक्रम चालवले जातात.
४. महाराष्ट्रात मुंबई-पुणे इत्यादी शहरांमध्ये या उपक्रमांचे आयोजन केले जाते.
५. गुजरातमधील अहमदाबाद शहरातील हेरिटेज वॉक प्रसिद्ध आहे.
१० कोश
१. कोश म्हणजे शब्दांचा, विविध माहितीचा वा ज्ञानाचा केलेला पद्धतशीर संग्रह.
२. विविध ज्ञानाचे विशिष्ट पद्धतीने केलेले संकलन आणि मांडणी म्हणजे कोश.
३. समाजाची बौद्धिक वा सांस्कृतिक गरज ज्या-ज्या प्रकारची असेल, त्या प्रकारच्या कोशवाङ्मयाची निर्मिती त्या-त्या समाजात होते.
४. कोशातील माहितीच्या मांडणीकरिता अचूकपणा, नेमकेपणा, वस्तुनिष्ठता, बांधीवपणा आणि अद्ययावतता या गोष्टी आवश्यक असतात.
५. कोशरचना करताना वाचकाची सोय आणि माहिती शोधण्याची सोय या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात.
६. कोशवाङ्मय राष्ट्राच्या सांस्कृतिक अवस्थेचे प्रतीक आहे.
७. कोशांचे सर्वसाधारणपणे चार विभागांत वर्गीकरण करता येते: (१) शब्दकोश (२) विश्वकोश (३) कोशसदृश वाङ्मय (४) सूची वाङ्मय
११. अभिलेखागार
१. अभिलेखागारांचे व्यवस्थापन हे तांत्रिकदृष्ट्या ग्रंथालय व्यवस्थापनाचेच एक अंग असते.
२. अभिलेखागारांमध्ये ऐतिहासिक दस्तऐवज व महत्त्वाच्या नोंदी असलेली कागदपत्रे त्यांमध्ये कोणताही बदल न करता सुरक्षित ठेवला जातो.
३. अभिलेखागारमुळे मूळ कागदपत्रे हवी तेव्हा संदर्भ म्हणून उपलब्ध होतात.
४. अभिलेखागारातील कागदपत्रे ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत विश्वासार्ह मानतात त्यामुळे तात्कालिक इतिहास, भाषा, लिपीचा अभ्यास करता येतो.
५. भारतातील पहिले सरकारी अभिलेखागार इसवी सन १८९१ मध्ये ‘इंपिरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट’ या नावाने कोलकाता येथे स्थापन झाले.
६. भारतातील दिल्ली येथील ‘राष्ट्रीय अभिलेखागार’ हे आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार आहे.
७. महाराष्ट्र राज्य शासनाच्या अभिलेखागार संचालनालयाच्या शाखा मुंबई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद आणि नागपूर येथे आहेत.
८. पुणे अभिलेखागारात मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित सुमारे पाच कोटी मोडी लिपीतील कागदपत्रे आहेत. त्याला पेशवे दप्तर असे म्हणतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा