मराठी व्याकरण
संधी - स्वरसंधी
पूर्वज्ञान :
संधींचा अभ्यास करताना मराठीतील वर्णमालेतील स्वर व व्यंजन यांची ओळख असणे आवश्यक आहे.
संधी
संधी होताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये मिसळतात व त्या दोहोंबद्दल एक वर्ण तयार होतो. अशा दोन वर्णांच्या एकमेकांमध्ये एकत्र मिसळण्याच्या प्रकारास 'संधी' असे म्हणतात.
संधींचे प्रकार
स्वरसंधी :- स्वर + स्वर
एकमेकांशेजारी येणारे वर्ण हे जर स्वराने जोडले असतील तर त्यांना स्वरसंधी असे म्हणतात.
उदा. कवि + ईश्वर = (इ + ई = ई) = कवीश्वर.
व्यंजनसंधी :-
व्यंजन + व्यंजन किंवा व्यंजन + स्वर
एकमेकांशेजारी येणाऱ्या या दोन वर्णापैकी दोन्ही वर्ण व्यंजने असतील किंवा पहिला वर्ण व्यंजन व दुसरा वर्ण स्वर असेल तर त्याला व्यंजनसंधी असे म्हणतात.
उदा.
सत् + जन = (तू + ज्) = सज्जन,
चित् + आनंद = (त् + आ) = चिदानंद
विसर्गसंधी
विसर्ग व्यंजन किंवा विसर्ग + स्वर
एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तेव्हा त्यास विसर्गसंधी असे म्हणतात.
उदा.
तपः + धन = तपोधन (विसर्ग + ध्)
दु: + आत्मा = दुरात्मा = (विसर्ग आ)
स्वरसंधी :-
(१) सजातीय स्वरसंधी :-
पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण 'र्हस्व' स्वर किंवा 'दीर्घ' स्वर असल्यास व दुसऱ्या शब्दाचा पहिला अक्षराचा स्वर हा त्याच प्रकारचा स्वर 'हस्व' स्वर किंवा 'दीर्घ' स्वर असल्यास त्या दोघांतून निर्माण होणारा स्वर त्याच जातीतील एकच दीर्घ स्वर असतो तो सजातीय स्वर संधी होय.
1. र्हस्व + र्हस्व = दीर्घ
2. र्हस्व + दीर्घ = दीर्घ
3. दीर्घ + र्हस्व = दीर्घ
उदा.
पोटशब्द एकत्र येणारे स्वर जोडशब्द
१) सूर्य + अस्त = (अ + अ = आ) = सूर्यास्त
२) देव + आलय = (अ + आ = आ) = देवालय
३) विद्या + अर्थी = (आ + अ = आ) = विद्यार्थी
४) महिला + आश्रम =(आ + आ = आ)= महिलाश्रम
५) मुनि + इच्छा = (इ + इ = ई) = मुनीच्छा
६) गिरि + ईश = (इ + ई = ई) = गिरीश
७) मही + ईश = (ई + ई = ई) = महीश
८) गुरु + उपदेश = (उ + उ = ऊ) = गुरुपदे
९) भू + उद्धार = (ऊ + उ = ऊ) = भूद्धार
(२) गुणादेश
१) 'अ' किंवा 'आ' यांच्यापुढे 'इ' किंवा 'ई' आल्यास त्या दोहोंऐवजी 'ए' येतो.
उदा.
पोटशब्द एकत्र येणारे स्वर जोडशब्द
ईश्वर इच्छा = (अ + इ = ए) = ईश्वरेच्छा
गण ईश = (अ + ई = ए) = गणेश
उमा ईश = (आ + ई = ए) = उमेश
२) 'अ' किंवा 'आ' यांच्यापुढे 'उ' किंवा 'ऊ' आल्यास 'ओ' येतो.
उदा.
पोटशब्द एकत्र येणारे स्वर जोडशब्द
चंद्र + उदय = अ + उ =ओ चंद्रोदय
महा+ उत्सव = आ + उ =ओ महोत्सव
३) 'अ' किंवा 'आ' यांच्यापुढे 'ऋ' आल्यास त्या दोहोंऐवजी अर् येतो.
उदा.
पोटशब्द एकत्र येणारे स्वर जोडशब्द
देव + ऋषी = अ + ऋ = अर् देवर्षी
महा+ ऋषी = आ + ऋ = अर महर्षी
३) वृद्ध्यादेश
१) पहिल्या शब्दातील शेवटच्या अक्षरात 'अ' किंवा 'आ' स्वर आले व त्यापुढे दुसर्या शब्दात पहिले अक्षर 'ए', 'ऐ' असे वर्ण आले असता 'ऐ' हा स्वर तयार होतो.
उदा.
पोटशब्द स्वर व संधी जोडशब्द
एक + एक = (अ + ए = ऐ) = एकैक
मत + ऐक्य = (अ + ऐ = ऐ) = मतैक्य
प्रजा + ऐक्य = (आ + ऐ = ऐ) = प्रजैक्य
सदा + एव = (आ+ ए = ऐ) = सदैव
२) पहिल्या शब्दातील शेवटच्या अक्षरात 'अ' किंवा 'आ' स्वर आले व त्यापुढे दुसर्या शब्दात पहिले अक्षर या स्वरापुढे 'ओ' किंवा 'औ' हे स्वर आल्यास त्या दोहोंबद्दल 'औ' हा स्वर येतो.
उदा.
पोटशब्द स्वर व संधी जोडशब्द
जल + ओघ = (अ +ओ = औ) = जलौघ
गंगा +ओघ = (आ + ओ = औ) = गंगौघ
४) यणादेश :-
'इ', 'उ' व 'ऋ' यांबद्दल अनुक्रमे 'य', 'व', 'र्' असे आदेश होतात. त्यांना 'यणादेश' (यण् + आदेश) असे म्हणतात.
१) पहिल्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरात 'इ' स्वर असेल व दुसऱ्या शब्दाच्या पहिल्या अक्षरात त्याच प्रकारचा दीर्घ विजातीय स्वर 'ई' आला तर त्या दोहों (इ+ई) बदल 'य 'हा वर्ण येतो व दुसऱ्या शब्दाच्या पहिल्या अक्षरातील स्वर मिसळतो.
उदा.
पोटशब्द स्वर व संधी जोडशब्द
१) प्रीती + अर्थ = (इ+अ=य् +अ=य) = प्रीत्यर्थ
२) इति + आदी = (इ+आ=य्+आ=या) = इत्यादी
३) अति + उत्तम = (इ+उ=य्+उ=यु) = अत्युत्तम
४) प्रति + एम = (इ+ए=यू+ए=ये) = प्रत्येक
२) पहिल्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरात 'उ' असेल व दुसऱ्या शब्दाच्या पहिल्या अक्षरात त्याच प्रकारच्या दीर्घ विजातीय स्वर 'ऊ' आला त्या दोहों (उ+ऊ) बदल 'व' हा वर्ण येतो व दुसऱ्या शब्दाच्या पहिल्या अक्षरातील स्वर मिसळतो.
उदा.
१) मनु + अंतर = (उ + अ = व् + अ = व) = मन्वंतर
२) सु+ अल्प = (उ + अ = व् + अ = व)= स्वल्प
३) पहिल्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरात 'ऋ' असेल तर त्याचा 'र' वर्ण होतो व दुसऱ्या शब्दाच्या पहिल्या शब्दातील स्वर मिसळतो.
१) पितृ + आज्ञा = (ऋ + आ + आ = रा) = पित्राज्ञा
(५) संप्रसारण :-
पहिल्या शब्दाच्या शेवटची अक्षरे य, व, र् वर्ण असतील तर 'य' यांच्याबद्दल 'इ', 'व' यांच्याबद्दल 'उ', 'र्' यांच्याबद्दल 'ऋ' आल्यास त्याला 'संप्रसारण' म्हणतात.
उदा.
१) येथे = इथे,
२) नव = नऊ,
३) गायी = गाई.
४) सोयी = सोई.
(६) पहिल्या शब्दाच्या शेवटी 'ए', 'ऐ', 'ओ', 'औ' हे स्वर आले तर दुसऱ्या शब्दाच्या पहिल्या अक्षरात 'अ', 'ई' हे स्वर आले तर त्याबद्दल 'अय', 'आय', 'अवी', 'आवि' असे वर्ण येतात.
उदा.
पोटशब्द स्वर व संधी जोडशब्द
ने + अन = (ए + अ = अय् +अ = अय) = नयन
गै + अन = (ए + अ = आय् + अ = आय) = गायन
गो + ईश्वर = (ओ + ई = अव् + ई = अवी) = गवीश्वर
नौ + इक = (औ + ई = आव् + इ = आवि) = नाविक
Next post : मराठी व्याकरण - समास
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा