पृथ्वीवरील हवेचा दाब व वारे

 पृथ्वीवरील हवेचा दाब व वारे

            एखादया प्रदेशातील हवेचे अनेक वर्षे निरीक्षण करून त्या प्रदेशातील हवेची दीर्घकालीन सरासरी स्थिती म्हणजे त्या प्रदेशाचे 'हवामान' होय.

उदा. शीत व कोरडे, उष्ण व दमट आणि उष्ण व कोरडे

 

हवेचा दाब :

         हवेच्या वजनामुळे निर्माण होणाऱ्या दाबाला हवेचा दाब म्हणतात.

          हवेचा दाब हा मिलिबार या एककात मोजला जातो.

           हवेचा दाब मोजण्यासाठी हवादाबमापक हे उपकरण वापरले जाते.

           पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे वातावरणातील हवा पृथ्वीपृष्ठाकडे ओढली जाते, म्हणून समुद्रसपाटीजवळ हवेचा दाब जास्त असतो.

           प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर असलेल्या हवेच्या स्तंभाचे वजन १००० किग्रॅ असते.

          जेथे तापमान जास्त असते, तेथे हवेचा दाब कमी असतो.

          पृथ्वीच्या पृष्ठभागालगत हवेचा दाब जास्त असतो.

          प्रदेशाच्या उंचीनुसार हवेचा दाब कमी होतो.

          हवेचा दाब पृथ्वीपृष्ठावर सर्वत्र सारखा नसतो.

 

प्रदेशाची उंची व हवेचा दाब :

           हवेतील धूलिकण, बाष्प, जड वायू इत्यादी घटकांचे प्रमाण भूपृष्ठालगत जास्त असते. उंची वाढत जाते, तसे हे प्रमाण कमी होते. म्हणजेच भूपृष्ठापासून जसजसे उंच जावे तसतशी हवा विरळ होत जाते. परिणामी हवेचा दाब उंचीनुसार कमी होतो.

 

तापमान व हवेचा दाब:

            जास्त तापमानामुळे हवा गरम होते, प्रसरण पावते आणि हलकी होते. जमिनीलगतची अशी हवा आकाशाकडे वर जाते, त्यामुळे सदर प्रदेशातील हवेचा दाब कमी होतो.

         तापमानाच्या पट्ट्यांचा अक्षवृत्तीय विस्तार हा जास्त असतो, तर हवेच्या दाबांचे पट्टे कमी रुंदीचे असतात.

 

भूपृष्ठावरील हवेचे दाबपट्टे :

          विषुववृत्तापासून उत्तर ध्रुवाकडे आणि दक्षिण ध्रुवाकडे सूर्यापासून पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेमुळे तापमानाचे वितरण असमान असते. त्यामुळे भूपृष्ठावरील हवेचे दाबपट्टे निर्माण होतात.

1.       विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा :

2.      मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे :

3.       उपध्रुवीय कमी दाबाचे पट्टे :

4.       ध्रुवीय जास्त दाबाचे पट्टे :

5.     हवा दाबपट्ट्यांचे आंदोलन (Oscillation of pressure belts) :

 

          1. विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा :

अक्षांश : ०° ते ५° उत्तर व ०° ते ५° दक्षिण

भौगोलिक कारण :

         कर्कवृत्त ते मकरवृत्त या भागात सूर्याच्या लंबरूप पडणाऱ्या किरणांमुळे या प्रदेशातील हवा तापते, प्रसरण पावते आणि हलकी होऊन आकाशाकडे जाते. म्हणून या प्रदेशाच्या मध्यवर्ती भागात हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो.

 

            2. मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे :

अक्षांश : उत्तर गोलार्धात २५° ते ३५° आणि दक्षिण गोलार्धात २५° ते ३५°

भौगोलिक कारण :

          विषुववृत्तीय प्रदेशातून आकाशाकडे गेलेली अधिक उंचीवर गेल्यानंतर ध्रुवीय प्रदेशाकडे उत्तर व दक्षिण दिशेत वाहू लागते, ही उष्ण व हलकी अहते उंचावरील कमी तापमानामुळे ती थंड होऊन जड होते आणि उत्तर व दक्षिण गोलार्धांत २५° ते ३५° अक्षवृत्तांच्या दरम्यान जमिनीच्या दिशेने खाली येते. परिणामी, हवेच्या जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात.

           पृथ्वीवरील बहुतेक उष्ण वाळवंटे या प्रदेशात आढळतात.

 

             3. उपध्रुवीय कमी दाबाचे पट्टे :

अक्षांश : ५५° ते ६५° उत्तर व  ५५° ते ६५° दक्षिण

भौगोलिक कारण :

          पृथ्वीचे ध्रुव वक्र असल्याने वाऱ्यांना बाहेर पडण्यास जास्त वाव मिळतो. पृथ्वीच्या ध्रुवाच्या कमी क्षेत्राने हवेचे पृष्ठभागावर कमी घर्षणामुळे तसेच परिवलन गतीमुळे हवा बाहेर फेकली जाऊन  ५५° ते ६५° अक्षवृत्तांच्या दरम्यान उत्तर व दक्षिण गोलार्धात कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो.

 

             4. ध्रुवीय जास्त दाबाचे पट्टे :

अक्षांश : ८०° ते ९०° उत्तर व ८०° ते ९०° दक्षिण

भौगोलिक कारण:

             दोन्ही ध्रुवीय प्रदेशांतील शून्य अंश सेल्सिअसपेक्षाही कमी तापमानामुळे येथील हवा थंड असते. परिणामी, ध्रुवीय प्रदेशात ८०° ते ९०° उत्तर व दक्षिण या अक्षवृत्तां दरम्यान हवेचे जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात. त्यांना 'ध्रुवीय जास्त दाबाचे पट्टे' असे म्हणतात.

 

              5. हवा दाबपट्ट्यांचे आंदोलन (Oscillation of pressure belts) :

अक्षांश : ५° ते ७° उत्तर  व ५° ते ७° दक्षिण

भौगोलिक कारण:

           सूर्याच्या उत्तरायण व दक्षिणायन यांमुळे सूर्यप्रकाशाचा कालावधी आणि तीव्रता विषुववृत्तापासून उत्तर व दक्षिण गोलार्धांत दरम्यान बदलत जाते; त्यामुळे तापमानपट्टे व त्यांवर अवलंबून असलेल्या दाबपट्ट्यांच्या स्थानात बदल सर्वसाधारणपणे उत्तरायणात ५° ते ७° उत्तरेकडे किंवा दक्षिणायनात ५° ते ७° दक्षिणेकडे असा असतो. हे बदलच हवा दाबपट्ट्यांचे आंदोलन (Oscillation of pressure belts) म्हणून ओळखले जाते.

 

वारा:

      तापमानातील फरकामुळे हवेच्या दाबात बदल होऊन हवा जास्त हवेच्या दाबाकडून कमी हवेच्या दाबाकडे हवा क्षितिजसमांतर दिशेत वाहू लागते, त्यास 'वारा' म्हणतात.

 

वाऱ्याचा वेग किंवा गती :

         हवेच्या दाबाच्या कमी व जास्त फरकातील तीव्रतेचा परिणाम वाऱ्याच्या गतीवर होतो.

         हवेच्या दाबातील फरक जेथे कमी असेल, तेथे वारे मंद गतीने वाहतात.

         जागतिक पातळीत हवेच्या दाबातील फरक जेथे अधिक असेल, तेथे वारे वेगाने वाहतात,

          वाऱ्याचा वेग किलोमीटर. प्रति तास किंवा नॉट्स या परिमाणात मोजला जातो,

          वारे ज्या दिशेकडून वाहत येतात, त्या दिशेच्या नावाने ते ओळखले जातात.

 

वाऱ्यांचे प्रकार

ग्रहीय वारे :

दोन्ही गोलार्धांत २५° ते ३५° अक्षवृत्तांच्या दरम्यान

           पृथ्वीवर जास्त दाबाच्या पट्ट्यांकडून कमी दाबाच्या पट्ट्यांकडे वर्षभर नियमितपणे पृथ्वीवर विस्तीर्ण क्षेत्रात वारे वाहतात. त्यामुळे त्यांना ग्रहीय वारे म्हणतात.

उदा. : पूर्वीय वारे, पश्चिमी वारें, ध्रुवीय वारे.

पूर्वीय वारे

          पृथ्वीच्या परिवलनामुळे हे दोन्ही वारे दिशा बदलतात.

           उत्तर गोलार्धात हे वारे ईशान्येकडून नैऋत्येकडे वाहतात, तर दक्षिण गोलार्धात हे वारे आग्नेयेकडून वायव्येकडे वाहतात.

           पुढे हे दोन्ही वारे विषुववृत्ताजवळील शांत हवेच्या पट्ट्याजवळ येऊन मिळतात. या वाऱ्यांना पूर्वीय वारे असे म्हणतात.

       हे वारे दोन्ही गोलार्धात मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून ६०° अक्षवृत्ताच्या जवळ असलेल्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहतात.

पश्चिमी वारे

           पृथ्वीच्या परिवलनामुळे वारे त्यांची मूळ दिशा बदलतात. दक्षिण गोलार्धात हे वारे वायव्येकडून आग्नेयेकडे, तर उत्तर गोलार्धात नैऋत्येकडून ईशान्येकडे वाहतात. या वाऱ्यांना पश्चिमी वारे असे म्हणतात.

ध्रुवीय वारे

           दोन्ही गोलार्धांत ध्रुवीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून उपध्रुवीय (५५° ते ६५°) कमी दाबाच्या पट्ट्याकडे जे वारे वाहतात, त्यांना ध्रुवीय वारे असे म्हणतात.

         हे वारे सर्वसाधारणपणे पूर्वेकडून पश्चिमेकडे या दिशेने वाहतात.

 

दक्षिण गोलार्धात वारे अतिशय वेगाने वाहतात :

दक्षिण गोलार्धात जलभाग जास्त आहे.

दक्षिण गोलार्धात भूपृष्ठाच्या उंच सखलपणाचा अडथळा नाही.

कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्यामुळे दक्षिण गोलार्धात वारे उत्तर गोलार्धापेक्षा जास्त वेगाने वाहतात.

 

दक्षिण गोलार्धात अतिशय वेगाने वाहणारे वारे :

1.  'गरजणारे चाळीस' (Roaring Forties)  :

2.  'खवळलेले पन्नास' (Furious Fifties) :

3. 'किंचाळणारे साठ' (Screeching Sixties) :

 

1.  'गरजणारे चाळीस' (Roaring Forties)  :

४०° दक्षिण अक्षांशापलीकडे हे वारे अतिशय वेगाने वाहतात. या भागात या वाऱ्यांना 'गरजणारे चाळीस' (Roaring Forties) असे म्हणतात.

2.  खवळलेले पन्नास' (Furious Fifties) :

५०° दक्षिण अक्षांशाच्या भागात हे वारे वादळाच्या वेगाने वाहत असतात. या भागात त्यांना 'खवळलेले पन्नास' (Furious Fifties) म्हणतात.

3. 'किंचाळणारे साठ' (Screeching Sixties) :

६०° दक्षिण अक्षांशाभोवती वारे वादळाच्या वेगाबरोबरच प्रचंड आवाजाने वाहतात. त्यांना 'किंचाळणारे साठ' (Screeching Sixties) म्हणतात.

 

स्थानिक वारे :

काही वारे कमी कालावधीत व विशिष्ट प्रदेशात निर्माण होतात आणि तुलनेने मर्यादित क्षेत्रात वाहतात, हे स्थानिक वारे असतात.

 

विषुववृत्तीय शांत पट्टा (Doldrums) :

विषुववृत्ताच्या उत्तर व दक्षिणेस सुमारे ५० अक्षवृत्तापर्यंत वर्षातील बराच काळ हवा शांत असल्याने तेथे वारे वाहत नाहीत; म्हणून या पट्ट्याला विषुववृत्तीय शांत पट्टा (Doldrums) असे म्हणतात.

 

अश्व अक्षांश (Horse Latitude) :

कर्कवृत्त व मकरवृत्ताजवळच्या २५° ते ३५° उत्तर व दक्षिण अक्षवृत्तांदरम्यान जास्त दाबाचा पट्टा असतो. हा पट्टा शांत पट्टा आहे, याला अश्व अक्षांश (Horse Latitude) असे म्हणतात.

 

जमीन व सागरी भागातील हवेच्या दाबात फरक असतो:

        जमीन जास्त घनतेच्या पदार्थांनी बनलेली आहे. जमीन स्थिर व अपारदर्शक असते, त्यामुळे जमीन अधिक लवकर तापते, जमीनीवर उष्णतेचे वहन जलद गतीने व जास्त प्रमाणात

        जमिनीच्यामानाने पाण्याची घनता कमी असते, पाणी अस्थिर व पारदर्शक असते, त्यामुळे पाणी लवकर तापत नाही.

         परिणामी, जमीन व सागरी भागातील हवेच्या दाबात फरक असतो.

 

दिवसा हवेचा दाब जास्त असतो व समुद्रापेक्षा किनारी भागात हवेचा दाब कमी असतो :

दिवसा समुद्राच्या पाण्यापेक्षा किनारी भागातील जमीन लवकर व जास्त प्रमाणात तापते, तेथील हवाही जास्त तापते व हवेचा दाब कमी राहतो.

 समुद्राचे पाणी उशिरा तापते, त्यामुळे समुद्रावरील हवा कमी तापते व हवेचा दाब जास्त असतो.

 

सागरी (खारे) वारे

दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वाहणारे वारे सागरी (खारे) वारे होत.

 

भूमीय (मतलई) वारे

रात्री समुद्रापेक्षा जमीन लवकर थंड होते. तेथे हवेचा दाब जास्त असतो, तेव्हा भूमीय (मतलई) वारे जमिनीवरून समुद्राकडे वाहतात.

 

वेगवेगळ्या प्रदेशांत विशिष्ट परिस्थितीत वाहणारे स्थानिक वारे :

वाऱ्याचे नाव

लू (Loo), सिमूम (Simoom), चिनूक (chinook) (which means snow eater), मिस्ट्रल (Mistral), बोरा (Bora), पांपेरो (Pampero), फॉन (Fohn)

 

लू (Loo),

उष्ण व कोरडे

उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात उन्हाळ्यात बहुधा दुपारी वाहतात.हे बारे थरच्या वाळवंटी प्रदेशाकडून येतात.

 

 सिमूम (Simoom):

उष्ण व कोरडे व विनाशकारी

सहारा आणि अरेबियन वाळवंटांतून अतिशय वेगाने वाहतात. हे वारे शक्तिशाली असल्याने विध्वंसक असतात.

 

चिनूक (chinook) (which means snow eater)

उबदार आणि कोरडे

उत्तर अमेरिकेतील रॉकी पर्वताच्या पूर्व उतारावरून खाली वाहतात, परिणामी तेथील बर्फ वितळते, त्यामुळे दन्यांमधील तापमानात वाढ होते.

 

मिस्ट्रल (Mistral)

थंड आणि कोरडे

स्पेन, फ्रान्स आणि भूमध्य सागराच्या किनाऱ्यालगतच्या प्रदेशात वाहतात. हे वारे आल्प्स पर्वतावरून येतात. या थंड वायांमुळे किनाऱ्यालगतच्या तापमानात घट होते.

 

बोरा (Bora)

थंड आणि कोरडे

आल्प्स पर्वताच्या उतारावरून इटली देशाच्या किनारी भागाकडे वाहतात.

 

पांपेरो (Pampero)

थंड आणि कोरडे

दक्षिण अमेरिकेतील पंपास गवताळ प्रदेशात वाहतात.

 

फॉन (Fohn)

उष्ण आणि कोरडे

आल्प्स पर्वताच्या उत्तर भागात वाहतात.

 

हंगामी वारे (मोसमी) :

वाहण्याची दिशा:

मोसमी वारे हे मोठ्या प्रमाणावरील खारे व मतलई वारेच असतात.

उन्हाळ्यात मोसमी वारे समुद्रावरून जमिनीकडे आणि हिवाळ्यात जमिनीकडून समुद्राकडे वाहतात.

आग्नेय आशिया, पूर्व आफ्रिका, उत्तर ऑस्ट्रेलिया या प्रदेशांवर मोसमी वाऱ्यांचा विशेष परिणाम होताना आढळतो.

 

मोसमी वारे व भारतीय उपखंड

मोसमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे भारतीय उपखंडात उन्हाळा व हिवाळा, पावसाळा व मान्सून परतीचा काळ असे ऋतु होतात.

नैऋत्य मोसमी वारे :

भारतीय उपखंडावर होणारी बहुतांश वृष्टी ही मोसमी वाऱ्यांच्या प्रभावाने होते.

विषुववृत्त ओलांडल्यावर नैऋत्य दिशेकडून भारतीय उपखंडाकडे

 जून ते सप्टेंबर या कालावधीत वाहतात.

 हे वारे बाष्पयुक्त असतात.

 

'ईशान्य मोसमी वारे'

सप्टेंबर ते डिसेंबरपर्यंत

भारतीय उपखंडाकडून विषुववृत्ताकडे वारे वाहू लागतात.

हे वारे कोरडे असतात.

 

आवर्त :

एखादया ठिकाणी कमी हवेच्या दाबाकडे सभोवतालच्या प्रदेशातील जास्त हवेच्या दाबाकडून वेगाने वारे वाहतात. तेव्हा तेथे आवर्त वाऱ्यांची परिस्थिती निर्माण होते.

दिशा :

उत्तर गोलार्धात -  घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेत वाहतात.

दक्षिण गोलार्धात - घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाहतात.

परिणाम : आकाश ढगाळ असते, वारे वेगाने वाहतात, भरपूर पाऊस पडतो.

हवेची स्थिती दर्शवणाच्या नकाशात आवर्ताचा केंद्रभाग हा 'L' (Low) या अक्षराने दाखवतात.

आवर्तांना 'चक्रीवादळ' असेही म्हणतात.

 

चक्रीवादळे :

 'टायफून' :

पॅसिफिक महासागराच्या पश्चिम भागात, जपान, चीन, फिलिपाइन्स इत्यादी देशांच्या किनाऱ्यालगत निर्माण होणारी वादळे 'टायफून' नावाने ओळखली जातात.

प्रदेश : पॅसिफिक महासागराच्या पश्चिम भागात, जपान, चीन, फिलिपाइन्स

 महिने : जून ते ऑक्टोबर

वेग : वेगवान

परिणाम : वेगाने वाहणारे वारे आणि मुसळधार पाऊस यांमुळे ती विनाशकारी असतात.

 

हरिकेन्स

कॅरेबियन समुद्रात निर्माण होणारी चक्रीवादळे म्हणजे 'हरिकेन्स' होय.

प्रदेश  : कॅरेबियन समुद्रात

वेग : ताशी कमीत कमी ६० किमी

परिणाम : विनाशकारी

 

प्रत्यावर्त :

एखादया क्षेत्रात विशिष्ट वातावरणात केंद्रभागी हवेचा अधिक दाब असतो तेव्हा केंद्रभागाकडून वारे सभोवतालच्या प्रदेशाकडे चक्राकार दिशेत वाहतात

दिशा :

उत्तर गोलार्धात - घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाहतात,

दक्षिण गोलार्धात - घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वाहतात.

परिणाम : निरभ्र आकाश, कमी वेगाने वाहणारे वारे आणि अतिशय उत्साहवर्धक हवामान असते.

हवेची स्थिती दर्शवणाऱ्या नकाशात प्रत्यावर्ताचा केंद्रभाग ‘H’ (High) या अक्षराने दाखवतात.

 

हवामान, हवेचा दाब व वारे – MCQ

१. एखाद्या प्रदेशातील हवेची दीर्घकालीन सरासरी स्थिती म्हणजे काय?

अ) तापमान

ब) हवामान

क) हवेचा दाब

ड) वारा

उत्तर: ब) हवामान

 

२. हवेचा दाब कोणत्या एककात मोजला जातो?

अ) किलोमीटर

ब) नॉट्स

क) मिलिबार

ड) सेल्सिअस

उत्तर: क) मिलिबार

 

३. हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात?

अ) तापमापक

ब) पर्जन्यमापक

क) हवादाबमापक

ड) आर्द्रतामापक

उत्तर: क) हवादाबमापक

 

४. समुद्रसपाटीजवळ हवेचा दाब जास्त का असतो?

अ) तापमान जास्त असल्यामुळे

ब) गुरुत्वाकर्षणामुळे हवा पृथ्वीपृष्ठाकडे ओढली जाते

क) पाऊस जास्त पडतो म्हणून

ड) वारे जास्त वेगाने वाहतात म्हणून

उत्तर: ब) गुरुत्वाकर्षणामुळे हवा पृथ्वीपृष्ठाकडे ओढली जाते

 

५. तापमान जास्त असलेल्या प्रदेशात हवेचा दाब कसा असतो?

अ) जास्त

ब) कमी

क) समान

ड) बदलत नाही

उत्तर: ब) कमी

 

६. प्रदेशाची उंची वाढत गेल्यास हवेचा दाब काय होतो?

अ) वाढतो

ब) कमी होतो

क) स्थिर राहतो

ड) दुप्पट होतो

उत्तर: ब) कमी होतो

 

७. उंची वाढल्यावर हवा कशी होते?

अ) दाट

ब) जड

क) विरळ

ड) दमट

उत्तर: क) विरळ

 

८. जास्त तापमानामुळे हवा काय होते?

अ) थंड व जड होते

ब) गरम, प्रसरण पावून हलकी होते

क) आकुंचन पावते

ड) स्थिर होते

उत्तर: ब) गरम, प्रसरण पावून हलकी होते

 

९. हवा जास्त दाबाकडून कोणत्या दिशेने वाहते?

अ) जास्त दाबाकडे

ब) कमी दाबाकडे

क) पूर्वेकडेच

ड) पश्चिमेकडेच

उत्तर: ब) कमी दाबाकडे

 

१०. क्षितिजसमांतर दिशेत वाहणाऱ्या हवेला काय म्हणतात?

अ) पाऊस

ब) वारा

क) दाब

ड) तापमान

उत्तर: ब) वारा

 

हवेचे दाबपट्टे

 

११. विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा कोणत्या अक्षांशांदरम्यान आहे?

अ) २५° ते ३५°

ब) ५५° ते ६५°

क) ०° ते ५° उत्तर व दक्षिण

ड) ८०° ते ९०°

उत्तर: क) ०° ते ५° उत्तर व दक्षिण

 

१२. विषुववृत्तीय प्रदेशात हवा वर का जाते?

अ) हवा थंड असल्यामुळे

ब) हवा गरम होऊन हलकी झाल्यामुळे

क) पाऊस पडल्यामुळे

ड) गुरुत्वाकर्षणामुळे

उत्तर: ब) हवा गरम होऊन हलकी झाल्यामुळे

 

१३. मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे कोणत्या अक्षांशांदरम्यान आहेत?

अ) ०° ते ५°

ब) २५° ते ३५°

क) ५५° ते ६५°

ड) ८०° ते ९०°

उत्तर: ब) २५° ते ३५°

 

१४. पृथ्वीवरील बहुतेक उष्ण वाळवंटे कोणत्या प्रदेशात आढळतात?

अ) विषुववृत्तीय प्रदेशात

ब) मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्यांत

क) ध्रुवीय प्रदेशात

ड) उपध्रुवीय प्रदेशात

उत्तर: ब) मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्यांत

 

१५. उपध्रुवीय कमी दाबाचे पट्टे कोणत्या अक्षांशांदरम्यान आहेत?

अ) ५° ते ७°

ब) २५° ते ३५°

क) ५५° ते ६५°

ड) ८०° ते ९०°

उत्तर: क) ५५° ते ६५°

 

१६. ध्रुवीय जास्त दाबाचे पट्टे कोणत्या अक्षांशांदरम्यान आहेत?

अ) ०° ते ५°

ब) २५° ते ३५°

क) ५५° ते ६५°

ड) ८०° ते ९०°

उत्तर: ड) ८०° ते ९०°

 

१७. ध्रुवीय प्रदेशातील हवा जास्त दाबाची असण्याचे प्रमुख कारण कोणते?

अ) जास्त पाऊस

ब) अतिशय कमी तापमान

क) जास्त आर्द्रता

ड) जास्त सूर्यप्रकाश

उत्तर: ब) अतिशय कमी तापमान

 

१८. हवा दाबपट्ट्यांचे आंदोलन साधारण किती अक्षांशांनी होते?

अ) १° ते २°

ब) ५° ते ७°

क) १०° ते १२°

ड) १५° ते २०°

उत्तर: ब) ५° ते ७°

 

वाऱ्यांचे प्रकार

 

१९. वर्षभर नियमितपणे विस्तीर्ण क्षेत्रात वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात?

अ) स्थानिक वारे

ब) हंगामी वारे

क) ग्रहीय वारे

ड) भूमीय वारे

उत्तर: क) ग्रहीय वारे

 

२०. खालीलपैकी कोणता ग्रहीय वारा आहे?

अ) लू

ब) चिनूक

क) पश्चिमी वारे

ड) मिस्ट्रल

उत्तर: क) पश्चिमी वारे

 

२१. उत्तर गोलार्धात पूर्वीय वारे कोणत्या दिशेने वाहतात?

अ) आग्नेय ते वायव्य

ब) ईशान्य ते नैऋत्य

क) नैऋत्य ते ईशान्य

ड) वायव्य ते आग्नेय

उत्तर: ब) ईशान्य ते नैऋत्य

 

२२. दक्षिण गोलार्धात पूर्वीय वारे कोणत्या दिशेने वाहतात?

अ) ईशान्य ते नैऋत्य

ब) नैऋत्य ते ईशान्य

क) आग्नेय ते वायव्य

ड) वायव्य ते आग्नेय

उत्तर: क) आग्नेय ते वायव्य

 

२३. उत्तर गोलार्धात पश्चिमी वारे कोणत्या दिशेने वाहतात?

अ) नैऋत्य ते ईशान्य

ब) ईशान्य ते नैऋत्य

क) आग्नेय ते वायव्य

ड) वायव्य ते आग्नेय

उत्तर: अ) नैऋत्य ते ईशान्य

 

२४. ध्रुवीय वारे सर्वसाधारणपणे कोणत्या दिशेने वाहतात?

अ) पश्चिमेकडून पूर्वेकडे

ब) पूर्वेकडून पश्चिमेकडे

क) उत्तरेकडून दक्षिणेकडे

ड) दक्षिणेकडून उत्तरेकडे

उत्तर: ब) पूर्वेकडून पश्चिमेकडे

दक्षिण गोलार्धातील वेगवान वारे

 

२५. ‘गरजणारे चाळीस’ कोणत्या अक्षांशाच्या आसपासचे वारे आहेत?

अ) ३०° दक्षिण

ब) ४०° दक्षिण

क) ५०° दक्षिण

ड) ६०° दक्षिण

उत्तर: ब) ४०° दक्षिण

 

२६. ‘खवळलेले पन्नास’ कोणत्या अक्षांशाच्या भागात वाहतात?

अ) ४०° दक्षिण

ब) ५०° दक्षिण

क) ६०° दक्षिण

ड) ७०° दक्षिण

उत्तर: ब) ५०° दक्षिण

 

२७. ‘किंचाळणारे साठ’ कोणत्या अक्षांशाभोवती वाहतात?

अ) ४०° दक्षिण

ब) ५०° दक्षिण

क) ६०° दक्षिण

ड) ७०° दक्षिण

उत्तर: क) ६०° दक्षिण

 

२८. दक्षिण गोलार्धात वारे अधिक वेगाने वाहण्याचे प्रमुख कारण कोणते?

अ) भूपृष्ठ जास्त आहे

ब) जलभाग जास्त आहे

क) तापमान कायम कमी आहे

ड) पर्वत जास्त आहेत

उत्तर: ब) जलभाग जास्त आहे

 

स्थानिक वारे

 

२९. कमी कालावधीत व विशिष्ट प्रदेशात निर्माण होणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात?

अ) ग्रहीय वारे

ब) स्थानिक वारे

क) ध्रुवीय वारे

ड) पश्चिमी वारे

उत्तर: ब) स्थानिक वारे

 

३०. ‘लू’ वारे कसे असतात?

अ) थंड व दमट

ब) उष्ण व कोरडे

क) थंड व कोरडे

ड) उबदार व दमट

उत्तर: ब) उष्ण व कोरडे

 

३१. लू वारे मुख्यतः कोठे वाहतात?

अ) दक्षिण अमेरिकेत

ब) उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात

क) युरोपमध्ये

ड) ऑस्ट्रेलियात

उत्तर: ब) उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात

 

३२. सिमूम वारे कोठे वाहतात?

अ) सहारा व अरेबियन वाळवंटात

ब) रॉकी पर्वतात

क) आल्प्स पर्वतात

ड) पंपास प्रदेशात

उत्तर: अ) सहारा व अरेबियन वाळवंटात

 

३३. ‘चिनूक’ या शब्दाचा अर्थ काय आहे?

अ) वाळवंटातील वारा

ब) बर्फ खाणारा

क) समुद्री वारा

ड) वादळी वारा

उत्तर: ब) बर्फ खाणारा

 

३४. चिनूक वारे कोणत्या प्रदेशात वाहतात?

अ) रॉकी पर्वताच्या पूर्व उतारावर

ब) आल्प्सच्या दक्षिण उतारावर

क) सहारा वाळवंटात

ड) पंपास प्रदेशात

उत्तर: अ) रॉकी पर्वताच्या पूर्व उतारावर

 

३५. मिस्ट्रल वारे कसे असतात?

अ) उष्ण व कोरडे

ब) थंड व कोरडे

क) उष्ण व दमट

ड) उबदार व दमट

उत्तर: ब) थंड व कोरडे

 

३६. बोरा वारे कोठे वाहतात?

अ) इटलीच्या किनारी भागाकडे

ब) भारताच्या उत्तर भागात

क) पंपास प्रदेशात

ड) कॅरेबियन समुद्रात

उत्तर: अ) इटलीच्या किनारी भागाकडे

 

३७. पांपेरो वारे कोणत्या प्रदेशात वाहतात?

अ) उत्तर अमेरिका

ब) दक्षिण अमेरिकेतील पंपास गवताळ प्रदेश

क) उत्तर भारत

ड) जपान

उत्तर: ब) दक्षिण अमेरिकेतील पंपास गवताळ प्रदेश

 

३८. फॉन वारे कसे असतात?

अ) थंड व कोरडे

ब) उष्ण व कोरडे

क) उष्ण व दमट

ड) थंड व दमट

उत्तर: ब) उष्ण व कोरडे

 

सागरी व भूमीय वारे

 

३९. दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात?

अ) भूमीय वारे

ब) सागरी वारे

क) ध्रुवीय वारे

ड) पश्चिमी वारे

उत्तर: ब) सागरी वारे

 

४०. रात्री जमिनीवरून समुद्राकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात?

अ) सागरी वारे

ब) भूमीय वारे

क) पूर्वीय वारे

ड) हंगामी वारे

उत्तर: ब) भूमीय वारे

 

४१. दिवसा समुद्रापेक्षा जमीन लवकर का तापते?

अ) जमीन पारदर्शक असल्यामुळे

ब) जमीन अधिक लवकर उष्ण होते

क) समुद्र अधिक गरम असल्यामुळे

ड) समुद्राची घनता जास्त असल्यामुळे

उत्तर: ब) जमीन अधिक लवकर उष्ण होते

हंगामी वारे

 

४२. उन्हाळ्यात मोसमी वारे कोणत्या दिशेने वाहतात?

अ) जमिनीकडून समुद्राकडे

ब) समुद्राकडून जमिनीकडे

क) ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे

ड) पूर्वेकडून पश्चिमेकडे

उत्तर: ब) समुद्राकडून जमिनीकडे

 

४३. हिवाळ्यात मोसमी वारे कोणत्या दिशेने वाहतात?

अ) समुद्राकडून जमिनीकडे

ब) जमिनीकडून समुद्राकडे

क) दक्षिणेकडून उत्तरेकडे

ड) पश्चिमेकडून पूर्वेकडे

उत्तर: ब) जमिनीकडून समुद्राकडे

 

४४. नैऋत्य मोसमी वारे भारतात साधारण कोणत्या कालावधीत वाहतात?

अ) जानेवारी ते मार्च

ब) जून ते सप्टेंबर

क) सप्टेंबर ते डिसेंबर

ड) मार्च ते मे

उत्तर: ब) जून ते सप्टेंबर

 

४५. नैऋत्य मोसमी वारे कसे असतात?

अ) कोरडे

ब) बाष्पयुक्त

क) अतिशय थंड

ड) कोरडे व थंड

उत्तर: ब) बाष्पयुक्त

 

४६. ईशान्य मोसमी वारे कोणत्या कालावधीत वाहतात?

अ) जून ते सप्टेंबर

ब) जानेवारी ते मार्च

क) सप्टेंबर ते डिसेंबर

ड) एप्रिल ते जून

उत्तर: क) सप्टेंबर ते डिसेंबर

 

४७. ईशान्य मोसमी वारे सामान्यतः कसे असतात?

अ) बाष्पयुक्त

ब) कोरडे

क) उष्ण व दमट

ड) अतिशय थंड

उत्तर: ब) कोरडे

आवर्त व प्रत्यावर्त

 

४८. आवर्ताच्या केंद्रभागी कोणता दाब असतो?

अ) जास्त दाब

ब) कमी दाब

क) समान दाब

ड) कोणताही दाब नसतो

उत्तर: ब) कमी दाब

 

४९. उत्तर गोलार्धात आवर्त कोणत्या दिशेने फिरते?

अ) घड्याळाच्या काट्याच्या दिशेने

ब) घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने

क) सरळ रेषेत

ड) पूर्वेकडून पश्चिमेकडे

उत्तर: ब) घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने

 

५०. दक्षिण गोलार्धात आवर्त कोणत्या दिशेने फिरते?

अ) घड्याळाच्या काट्याच्या दिशेने

ब) घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने

क) उत्तर दिशेने

ड) पूर्व दिशेने

उत्तर: अ) घड्याळाच्या काट्याच्या दिशेने

 

५१. हवेच्या स्थितीच्या नकाशावर आवर्ताचा केंद्रभाग कोणत्या अक्षराने दाखवतात?

अ) H

ब) L

क) C

ड) W

उत्तर: ब) L

 

५२. आवर्ताला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते?

अ) प्रतिचक्रवात

ब) चक्रीवादळ

क) मोसमी वारा

ड) सागरी वारा

उत्तर: ब) चक्रीवादळ

 

५३. प्रत्यावर्ताच्या केंद्रभागी कोणता दाब असतो?

अ) कमी दाब

ब) जास्त दाब

क) समान दाब

ड) शून्य दाब

उत्तर: ब) जास्त दाब

 

५४. उत्तर गोलार्धात प्रत्यावर्त कोणत्या दिशेने फिरते?

अ) घड्याळाच्या काट्याच्या दिशेने

ब) घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने

क) पूर्वेकडून पश्चिमेकडे

ड) पश्चिमेकडून पूर्वेकडे

उत्तर: अ) घड्याळाच्या काट्याच्या दिशेने

 

५५. प्रत्यावर्ताचा केंद्रभाग नकाशावर कोणत्या अक्षराने दाखवतात?

अ) L

ब) H

क) C

ड) A

उत्तर: ब) H

 

५६. प्रत्यावर्ताच्या वेळी सामान्यतः कसे हवामान असते?

अ) ढगाळ व पावसाळी

ब) निरभ्र आकाश व कमी वेगाचे वारे

क) मुसळधार पाऊस

ड) प्रचंड वादळ

उत्तर: ब) निरभ्र आकाश व कमी वेगाचे वारे

चक्रीवादळे

 

५७. ‘टायफून’ चक्रीवादळे प्रामुख्याने कोठे निर्माण होतात?

अ) अटलांटिक महासागराच्या पूर्व भागात

ब) पॅसिफिक महासागराच्या पश्चिम भागात

क) हिंदी महासागराच्या पश्चिम भागात

ड) भूमध्य समुद्रात

उत्तर: ब) पॅसिफिक महासागराच्या पश्चिम भागात

 

५८. टायफूनचा प्रभाव कोणत्या देशांच्या किनाऱ्यावर आढळतो?

अ) भारत, श्रीलंका, मालदीव

ब) जपान, चीन, फिलिपाइन्स

क) इटली, स्पेन, फ्रान्स

ड) ब्राझील, अर्जेंटिना, चिली

उत्तर: ब) जपान, चीन, फिलिपाइन्स

 

५९. टायफून साधारण कोणत्या महिन्यांत निर्माण होतात?

अ) जानेवारी ते मार्च

ब) जून ते ऑक्टोबर

क) नोव्हेंबर ते जानेवारी

ड) मार्च ते मे

उत्तर: ब) जून ते ऑक्टोबर

 

६०. कॅरेबियन समुद्रात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांना काय म्हणतात?

अ) टायफून

ब) हरिकेन्स

क) फॉन

ड) बोरा

उत्तर: ब) हरिकेन्स

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सामाजिक व राजकीय चळवळी इयत्ता १० वी विषय राज्यशास्त्र

निवडणूक प्रक्रिया इयत्ता १० वी विषय राज्यशास्त्र

राजकीय पक्ष इयत्ता १० वी विषय राज्यशास्त्र