शुक्रवार, २९ ऑक्टोबर, २०२१

Verb - क्रियापद

Part of Speech - Verb क्रियापद

क्रियापदाचे प्रमुख दोन प्रकार

1) Transitive Verbs सकर्मक क्रियापदे

2) Intransitive Verbs अकर्मक क्रियापदे

Incomplete verbs अपूर्ण क्रियापदे

Participle / Verbal Adjective धातुसाधित 

Auxiliary Verbs/Helping Verbs

Gerund कृदंन्त

Infinitive

Verb क्रियापद

      वाक्यातील क्रियादर्शक (कृती समजून सांगणारा शब्द) शब्द म्हणजे Verb क्रियापद होय. 

      क्रियापद शब्द प्रकारांचा उपयोग करून आपण करत असलेल्या क्रिया व्यक्त करतो. (कृती, अस्तित्व किंवा स्थिती, मालकी किंवा स्वामित्व, इच्छा हुकूम, भावना)

       क्रियापद हा वाक्यातील अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे. क्रियापदाने कृती समजते म्हणूनच कोणतेही वाक्य क्रियापदाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.

      क्रियापदावरूनच वाक्याचा काळ समजतो, क्रिया केव्हा घडली याचा बोध होतो.

       क्रियापदावरूनच वाक्याचा प्रकार समजतो, वाक्यातील क्रिया होकारार्थी की नकारार्थी याचा बोध होतो.

क्रियापदाचे प्रमुख दोन प्रकार

1) Transitive Verbs सकर्मक क्रियापदे

2) Intransitive Verbs अकर्मक क्रियापदे


1) Transitive Verbs सकर्मक क्रियापदे

           काही वेळेस क्रियेला अर्थ पूर्ण होण्यासाठी क्रियापदाला कर्माची अवश्यकता भासते, त्या वेळेस ते क्रियापद सकर्मक आहे असे म्हणतात.

           कर्मासहित येणाऱ्या क्रियापदाला सकर्मक क्रियापद म्हणतात.

           सकर्मक क्रियापद अशी कृती दाखवते की, जी कर्त्याकडून कर्माकडे किंवा दुसरया व्यक्तीकडे / वस्तूकडे स्थानांतरित झालेली असते.

Examples

1. Ram wrote a letter.

2. He ate a mango.

3. Seeta told a story.

 काही वेळेस सकर्मक क्रियापदाबरोबर दोन कर्मे येतात. 

त्यापैकी एक Direct Object प्रत्यक्ष कर्म असते तर दुसरे Indirect Object  अप्रत्यक्ष कर्म असते.

The teacher gave a prize to him.

1. Direct Object प्रत्यक्ष कर्म 

क्रियापदाला what ने प्रश्न विचारला असता, या प्रश्नाला जे उत्तर येते Direct Object प्रत्यक्ष कर्म असते.

प्रत्यक्ष कर्माचा वस्तूशी संबंध असतो

2. Indirect Object अप्रत्यक्ष कर्म

 क्रियापदाला whom ने प्रश्न विचारला असता, या प्रश्नाला जे उत्तर येते Indirect Object अप्रत्यक्ष कर्म असते.

अप्रत्यक्ष कर्माचा व्यक्तीशी संबंध असतो


2) Intransitive Verbs अकर्मक क्रियापदे

ज्या क्रियापदाला अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता भासत नाही त्यास Intransitive Verbs अकर्मक क्रियापद असे म्हणतात.

Example

1. He runs.

2. The dog barks.

3. She is coming.

4. They laugh.

वरील क्रियापदांना what/whom ने प्रश्न विचारला तरी उत्तर मिळत नाही. कारण ती अकर्मक क्रियापदे आहेत. अर्थपूर्तीसाठी त्यांना कर्माची गरज नाही.

Come, go, run, walk, stand, laugh, cry, fly, die, swim, fall, sit, jump.


1.  Incomplete verbs अपूर्ण क्रियापदे

ज्या क्रियादाला अर्थ पूर्ण करण्याकरिता इतर शब्दाची आवश्यकता भासते अशा क्रियापदाला Incomplete verbs अपूर्ण क्रियापदे असे म्हणतात.

Examples

He is a doctor.

She is a teacher.


2. Participle / Verbal Adjective धातुसाधित 

धातुसाधित हे क्रियापदाचे एक रूप आहे. प्रत्येक क्रियापदाचे दोन Participles आहेत.

1) Present Participle वर्तमानकालवाचक धातुसाधित

2) Past Participle भूतकालवाचक धातुसाधित


1) Present Participle वर्तमानकालवाचक धातुसाधित

वर्तमानकालवाचक धातुसाधित हे क्रियापदाला ing प्रत्यय लागून तयार होते.

 उपयोग

1. अपूर्ण काळ तयार करण्यासाठी

2. विशेषण म्हणून नामापूर्वी


2) Past Participle भूतकालवाचक धातुसाधित

भूतकालवाचक धातुसाधित हे क्रियापदाचे तिसरे रूप होय. बहुधा याच्या शेवटी n, en, d, ed, t होतात.

Examples

Gone, run, walked, died, spent, written

उपयोग

1. पूर्ण काळ तयार करण्यासाठी

2. Passive Voice बनवण्यासाठी


3. Auxiliary Verbs/Helping Verbs सहाय्यकारी क्रियापदे :

वाक्यातील क्रियापदाचा काळ, नकार, प्रश्न, आणि विशिष्ठ भाव व्यक्त करण्यासाठी Action Verb ला सहाय्यक व मदत म्हणून सोबत वापरले जातात.

Primary Auxiliary 

To be - am, is, are, was, were.

Have - have, has, had. 

Do - Do, does, did

Modal auxiliaries 

Shall, will, should, would, can, could, may, might, must, ought to. 


4.Gerund कृदंन्त

1. क्रियापदाच्या ing युक्त रूपात जेव्हा त्याचा नाम म्हणून उपयोग केला जातो तेव्हा Gerund किंवा Verbal Noun असे म्हणतात.

2. Gerund कृदंन्त V + ing हे Verbal Noun असून त्याचा उपयोग नाम म्हणून केला जातो.

Working, playing, reading, writing

Gerund कृदंन्तचा उपयोग

1. वाक्यचा कर्ता म्हणून

Playing cricket is his hobby.

2. क्रियापदाचे कर्म म्हणून

He helped giving money. 

3. शब्दयोगी अव्ययाचे कर्म म्हणून

They are fond of reading stories.

4. क्रियापदाचे पूरक शब्द म्हणून

She likes writing stories.

5. कर्ताचे पूरक शब्द म्हणून


5. Infinitive अनियमित मूळ रूप

1. वाक्यामध्ये क्रियापदाचा उपयोग to सहित केला असेल तेव्हा ते Infinitiveअसते.

2. सामान्यतः क्रियापद हे कर्त्याशी संबंध दाखवून त्याच्या लिंग, वचन, व पुरुष याप्रमाणे चालते. म्हणजे ते कर्त्याच्या संबंधाने मर्यादित किंवा परिमित असते, म्हणून त्यांना Finite Verbs असे म्हणतात.

3. परंतू Infinitive चा तसा कर्त्याशी संबंध नसून फक्त त्या क्रियापदाच्या क्रियेशी संबंध असतो. कर्त्याचा किंवा इतरांचा उल्लेख सुध्दा करीत नाही. म्हणून त्यांना Verb Infinitive किंवा Infinitive म्हणतात.

1. नाम म्हणून कर्ता 

To paint is hobby.

2. नाम म्हणून कर्म

She likes to paint.

3. विशेषण म्हणून

She uses this colour to paint.

4. क्रियाविशेषण म्हणून

She draws to paint.

5. नाम म्हणून पूरक

Her gretest joy is to paint.

रविवार, २४ ऑक्टोबर, २०२१

मराठी 'शब्दसिद्धी'

    मराठी व्याकरण : शब्दसिद्धी

भाषेतल्या शब्दाचे वर्गीकरण दोन प्रकारे करता येते.

(१) सिद्ध शब्द -

(अ) तत्सम

(आ) तद्भव

(इ) देशी

(ई) परभाषीय


(२) साधित शब्द - 

(अ) उपसर्गघटित शब्द

(आ) प्रत्ययघटित शब्द

(इ) सामासिक शब्द

(ई) अभ्यस्त शब्द

         शब्दसिद्धी म्हणजे मराठी भाषेमध्ये असलेल्या शब्दांच्या उगमाचा शोध घेणे होय.

शब्दसिद्धी म्हणजे 

      भाषेत आलेले शब्द कशा प्रकारे निर्माण झाले?

       कोणत्या मूळ भाषेतून आले?

    कोणत्या शब्दात बदल करून आपण नवीन शब्द घडवला ?


(१) सिद्ध शब्द

(अ) तत्सम शब्द - 

(संस्कृत भाषेतून जसेच्या तसे आलेले शब्द).

        संस्कृत भाषेतले असून जसेच्या तसे म्हणजे शब्दांच्या रूपात काही फरक न होता मराठी भाषेत आलेले शब्द. 

उदा.

कवि, मधु, गुरु, पिता, पुत्र, कन्या, वृक्ष, पुरुष, सत्कार, समर्थन, उत्सव पुष्प, जल, प्रीति, भीति, कर, ग्रंथ, पृथ्वी, भूगोल, विद्वान, भगवान, परंतु, यद्यपि, यथामति, कर्ण, पर्ण, अरण्य, हस्त, मस्तक, कर्म, ओठ, अग्नि, नदी, कमल इ.


(आ) तद्भव शब्द : -

(मूळ संस्कृत शब्दांच्या रूपात बदल करून मराठीत आलेले शब्द)

 उदा. :- संस्कृत  -  मराठी 

कर्ण -  कान, चक्र - चाक, अग्नि - आग, पर्ण - पान, विनती - विनंती, गृह - घर, पद - पाय, भ्रातृ - भाऊ, स्वसू - सासू, श्वशुर - सासरा, ग्राम - गाव, दुग्ध - दूध, ग्रास - घास, कोमल - कोवळा, ओष्ठ - ओठ, कर्म - काम, घर्म - घाम इ. 


(इ) देशी किंवा देशज :- (मूळ मराठी शब्द)

        महाराष्ट्रातील रहिवासींच्या बोली भाषेतील शब्द. असे मराठी शब्द जे तत्सम किंवा तद्भव किंवा परभाषीय नाहीत. 

उदा. 

झाड, दगड, धोंडा, पोडा, डोळा, डोके, हाड, पोट, गुडघा, बोका, रेडा, बाजरी, वांगे, लुगडे, झोप, खुळा, चिमणी, ढेकूण इ. 


(ई) परभाषीय :-

त्याचे दोन उपप्रकार आहेत. 

(अ) परकीय किंवा विदेशी शब्द 

(ब) स्वदेशी शब्द


(अ) परकीय किंवा विदेशी शब्द :- 

(अरबी, फारशी, इंग्रजी फ्रेंच, पोर्तुगीज, डच यासारख्या परकीय किंवा विदेशी शब्दांमधून आलेले शब्द)

 उदा. 

(१) इंग्रजी 

टेबल, पेपर, मार्क, नंबर, टीचर, सर, मॅडम, ऑफिस, ट्रेन, रेल्वे, बस, तिकिट, ड्रायव्हर, मोटर, कंडक्टर, स्टेशन पोस्ट, कार्ड, पार्सल, नर्स, डॉक्टर, पेशंट, इंजेक्शन, हॉस्पिटल, शर्ट, पँट, बटन, बॅट, बॉल, ड्रेस, ग्लास इ. 

(२) पोर्तुगीज

 बटाटा, तंबाखू, पगार, बिजागरे, को, हापूस, फणस,

(३) फारशी 

खाना, सामान, हकीकत, अत्तर, अब, पेशवा, पोशाख, सौदागर, कामगार, गुन्हेगार, फडनवीस

 (४) अरबी 

अर्ज, इनाम, हुकूम, मेहनत, जाहीर, मंजूर, शाहीर, साहेब, मालक इ.


(ब) स्वदेशी शब्द :- 

भारतीय भाषेतील शब्द किंवा भारतातील परप्रांतीय भाषेतील शब्द.

         इतर भारतीय भाषांमधून गुजराती, हिंदी, कानडी, तेलगू, तामिळी यांसारख्या भाषांमधून मराठीत आलेले शब्द.

उदा. 

(१) कानडी :-

अण्णा, अक्का, ताई, अडकित्ता, भाकरी, तूप, कुंची, कांबळे, खलबत्ता, विळी, गुढी, किल्ली, गुंडी इ.

(२) गुजराती :-

घी, दादर, शेट, दलाल, डबा, रिकामटेकडा

(३) तामिळी :-

 चिल्ली पिल्ली, सार, मठ्ठा -

(४) तेलगू :-

ताळा, अनरसा, किडूकमिडूक, शिकेकाई

(५) हिंदी :-

भाई, बेटा, बच्चा, मिलाप, तपास, दिल, और, बात, दाम, करोड इ.


(२) साधित शब्द - 

         मूळ धातूच्या किंवा शब्दाच्या मागे अथवा पुढे एक किंवा अनेक अक्षरे लावून जे शब्द बनतात ते साधित शब्द होय. 


(अ) उपसर्गघटित शब्द

उपसर्ग :

         मूळ धातूच्या किंवा शब्दाच्या मागे एक किंवा अनेक अक्षरे लावतात त्या अक्षरांना 'उपसर्ग' असे म्हणतात.

       उपसर्ग अव्ययरूप असून स्वतंत्रपणे येत नाहीत.

      ही अक्षरे उपसर्ग लागल्याने कधी कधी मूळ धातूचा अर्थ बदलतो.  

उदा. 

उपप्रमुख, उपवास अतिक्रम, अतिरेक, अतिप्रसंग अधिकरण, अध्ययन, अधिदैवत, अनुवाद, अनुमती, अनुस्वार, अपशब्द, अपशकुन, अपराध, अभ्युदय, अभिरुची, अभ्यास, अवगुण, अवनत, विसंगती, विपत्ती, विशेष, दुर्लभ, उत्तम, उत्प्रेक्षा, आक्रोश, उत्तीर्ण, उद्योग, उपकार, उपपद, परिपाठ, परिश्रम, आकर्ण, उपप्रमुख, पराभव, सुगम, सुशिक्षित, सुगंध, प्रतिध्वनी, प्रत्येक, प्रतिकूल, संगीत, संतोष ,संकल्प, प्रसिद्ध, प्रस्थान.


संस्कृत, फारसी, अरबी या भाषांतून मराठीने घेतलेले अनेक उपसर्ग व शब्द.
(१) संस्कृत 
उदा. 
अति - अतिरेक, अतिशय
उप - उपसंपादक, उपमुख्याध्यापक, 
अति - अतिशय, अत्यंत, 
अधि - अधिपती, अध्यक्ष, अधिकार, 
अनु - अनुकरण, अनुक्रम, अनुभव, 
अप - अपयश, अपमान, अपकार, 
अभि - अभिनंदन, अभिमुख, अभिनय, 
अव - अवतरण, अवमान, अवकृपा, 
आ - आजन्म, आमरण, आक्रमण, ,
उत् - उत्कर्ष, उत्पत्ती, उन्नती, 
उप - उपवास, उपनेत्र, उपाध्यक्ष, 
दुस् - दुर्गुण, दुर्दशा, दुष्कृत्य, दुर्जन, 
निर्, - निर्गत, निर्धन, निर्लज्ज
नि - निरंतर, निकामी, निरोगी,
परा - पराजय, पराक्रम, पराकाष्ठा,
परि - परिपाक, परिपूर्ण, परिणाम, परिवार,
 प्र - प्रबल, प्रगती, प्रवाह, प्रदोष, प्रकोप, 
प्रति - प्रतिकार, प्रतिबिंब, प्रतिदिन, 
वि - विख्यात, विज्ञान, विधवा, 
सम् - संस्कार, संस्कृत, संयोग, संगम, 
सु - सुग्रास, सुभाषित, सुकर,

(२) मराठी उपसर्ग
(अ-अन् , आड , अद, अव, नि, पड, फट, भर)
उदा.
अ-अन् - अजाण, अडाणी, अबोल, अनोळखी.
आड - आडनाव, आडवाट, आडकाठी, आडवळण.
अद -  अदपाव, अदशेर, अदकोस.
अव - अवजड, अवघड, अवदसा, अवकळा, अवलक्षण.
नि - निरोगी, निनावी, निकोप, निलाजरा, निकामी.
पड - पडजीभ, पडसाद, पडछाया, पडताळा.
फट - फटफजिती, फटकळ.
भर - भरजरी, भरधाव, भरदिवसा, भरचौकात.

(३) फारसी व अरबी उपसर्ग
(ऐन, कम, गैर, दर, ना, बद, बिन, बे, सर हर )
उदा. 
ऐन, दौलत, गैरसावध, गैरसोय, गैरहिशेबी, दरमहा, दरमजल, नालायक, नाकबूल, बदफैल, बदअंमल, बिनहरकत, बेअदबी, बेदाणा, बेफिकीर, बेपर्वा, बेगुमान, बेकायदा, बेकार, सरचिटणीस हरसाल, हरकामी.

ऐन - ऐनहंगाम, ऐनखर्च
कम - कमनशीब, कमजोर, कमकुवत.
गैर - गैरहजर, गैरशिस्त, गैरसमज,
दर  दररोज, दरसाल, दरशेकडा, 
ना - नाउमेद, नाराज, नापसंत, 
बद - बदनाम, बदसूर, बदलौकिक, 
बिन -  बिनचूक, बिनतक्रार, बिनधोक,
बे -  बेडर, बेइनाम, बेअब्रू, बेदम, 
सर - सरकार, सरदार, सरहद्द,  
हर -  हररोज, हरघडी, हरवख्त, 

(आ) प्रत्ययघटित शब्द :-

प्रत्यय :-

       शब्दाच्या किंवा धातूच्या पुढे एक किंवा अधिक अक्षरे लावतात, अशा अक्षरांना 'प्रत्यय' असे म्हणतात. 

       प्रत्यय लागून तयार झालेल्या शब्दाला 'प्रत्ययघटित' शब्द असे म्हणतात.

उदा. 

आई - खोदाई, लढाई, चढाई

आऊ - टिकाऊ, जळाऊ, लढाऊ

आळू - झोपाळू, लाजाळू, दयाळू

दार - दुकानदार, जमीनदार

गिरी - गुलामगिरी, कारागिरी,

इक - मानसिक, सामाजिक, लौकिक

इत - आनंदित, प्रेरित

त्व - जडत्व, गुरुत्व


प्रत्ययघटित शब्द दोन प्रकारचे असतात.

(१) कृत् किंवा धातुसाधित

(२) तद्धित किंवा नामसाधित


(१) कृत् किंवा धातुसाधित

      धातूंना प्रत्यय जोडून कृदन्त  किंवा धातुसाधित शब्द तयार केला जातो.

(१) संस्कृत प्रत्यय  : 

(क, न, ना, नीय, आ, ई, इक, त, ता, व्य, ति, य)

उदा. 

क - लेखक, रक्षक, पाचक, 

न - नयन, चरण, बदन, नंदन, पालन, 

ना - प्रार्थना, वेदना, कल्पना, तुलना, वंदना,

अनीय - श्रवणीय, मननीय, रमणीय, पूजनीय, वंदनीय,

आ - इच्छा, कथा, गुहा, चिंता

ई - हरि, त्यागी, भाषी. 

इक - रसिक, पथिक.

त -  कृत, मृत, व्यक्त, हत, नत, रत, भूत.

ता - त्राता, भर्ता, श्रोता, वक्ता, दाता, नेता, शास्ता,

व्य - कर्तव्य, श्रोतव्य, गन्तव्य, भवितव्य, 

ति -  कृति, स्तुति, नीति, युक्ति, शक्ति,

य - कार्य, देय, पेय, त्याज्य, भोग्य.


(२) मराठी प्रत्यय :

(अ, आ,  आई, आऊ, आरी, आळू, ई, ईक, ईत, ईव ऊ, खोर, णावळ, प, पि, णारा, रा)

उदा. 

अ - कर, डर, लूट, फूर, खोट, तूट, मेल, फोड,

आ - ओढा, ठेवा, झगडा, ठेचा, वेढा, पुकारा,

आई - खोदाई, चराई, पढाई, उजळाई, शिलाई

आऊ - टाकाऊ, जळाऊ, लढाऊ, विकाऊ, शिकाऊ.

आरी - पुजारी, पिंजारी, रंगारी,

आळू - झोपाळू, विसराळू, लाजाळू, सोसाळू

ई - कढी, मोडी, उडी, बुडी, रडी, थुंकी, बोली,

ईक - सडीक, पडीक, पढीक,

ईत - लखलखीत, चकचकीत,

ईव - रेखीव, जाणीव, कोरीव, घोटीव, पाळीव, आटीव.

ऊ - चालू, लागू, झाडू, उतारू

ऊन - करून, देऊन, बसून, उडून, रडून, हसून,

खोर - भांडखोर, चिडखोर,

णावळ - धुणावळ, लिहिणावळ, दळणावळ

प - दळप, कांडप, वाढप, 

पी - वाढपी, दळपी, कांडपी,

णारा - लिहिणारा, बोलणारा. 

रा - हसरा, नाचरा, बुजरा, दुखरा, तारक, मारक, गायक


(२) तद्धित किंवा नामसाधित, शब्दसाधित :-

         नामे, सर्वनामे, विशेषणे आणि अव्यये यांना प्रत्यय लावून किंवा धातू खेरीज इतर शब्दांना प्रत्यय लागून जे शब्द तयार होतात ते शब्द साधिते किंवा तद्धिते, नामसाधिते होत. 

(१) संस्कृत प्रत्यय :

(अ, इक, आत ईन, ईत, कीय, त्व, मान, वान)

उदा. 

अ - यादव, राघव, पांडव, भार्गव, सौभद्र,

इक - वाचिक, मानसिक, मासिक, लौकिक, धार्मिक,

इत - आनंदित, दुःखित, मूर्च्छित, उत्कंठित.

ईन - कुलीन, शालीन, नवीन,

कीय - परकीय, राजकीय, स्वकीय.

त्व - महत्त्व, विद्वत्व, जडत्व, मूर्खत्व, गुरुत्व,

मान - बुद्धिमान, श्रीमान

वान - बागवान, धनवान, विद्वान


(२) मराठी प्रत्यय :

(अ, आई, ई, कर, करी, कट, की, खोर, वाईक, सर)

उदा. 

तऱ्हेवाईक, मासलेवाईक, चेष्टेखोर, पाटीलकी, शेतकी, गावकी, मळकट, पोरकट, वारकरी, पहारेकरी, दिनकर, प्रभाकर, दांडगाई, शिष्टाई, खोदाई, गारठा, ओढा ओलसर, भोळसर.

अ - वेडा, ठेवा, ठेचा, भरडा, 

आई - शिलाई, लढाई, विटाई, 

ई - उडी, बुडी, बोली, चोरी, सावकारी,

ई - मापी, वजनी, लाकडी, पितळी.

कर - सुखकर, खेळकर, खोडकर, 

करी - शेतकरी, देणेकरी, भाडेकरी, 

कट - तेलकट, मातकट, धुरकट, 

की - माणुसकी, उनाडकी, 

खोर - भांडखोर, चिडखोर, चहाडखोर, 

वाईक - नातेवाईक, आस्थेवाईक, 

सर - गोडसर, वेडसर, काळसर, 


(३) फारसी प्रत्यय :

(गर, गार, ई, स्तान, गिरी, दार, दान बाज,  बंद, खाना, नवीस, णीस, आबाद, नामा) 

उदा. 

चिरेबंद, नफेबाज,दगलबाज, पोतदार, इमानदार, अबूदार, धारदार, घाटदार, डौलदार, हमाली, फकिरी, माहितगार, कामगार, दाणी, पिकदाणी, चहादाणी  हत्तीखाना, दारुखाना.

गर - सौदागर, जिनगर

गार - जादूगार, गुन्हेगार, 

ई - खुशी, मजुरी, नेकी, 

स्तान - अरबस्तान, तुर्कस्तान, कबरस्तान.

गिरी - गुलामगिरी, मुलुखगिरी, कारागिरी.

दार - दुकानदार, फौजदार, जमीनदार, 

दान - कलमदान, शामदान, अत्तरदाणी, 

बाज - दारूबाज, नखरेबाज, कुर्रेबाज, 

बंद - नालबंद, पगडबंद, हत्यारबंद, 

खाना - कारखाना, तोफखाना, दवाखाना.

नवीस - चिटनवीस, फडनवीस, कारखानवीस,

नीस - चिटणीस, फडणीस.

आबाद - औरंगाबाद, हैदराबाद, अहमदाबाद.

नामा - हुकुमनामा, करारनामा, पंचनामा, जाहीरनामा.


(इ) अभ्यस्त शब्द :-

(१) पूर्णाभ्यस्त शब्द

               निरनिराळ्या शब्दांच्या जातींचा एकच पूर्ण शब्द द्विरुक्त होतो म्हणजे दोनदा येतो.

 उदा.

तिळतिळ, हालहाल, तुकडेतुकडे, कोणीकोणी, एकेक, हळूहळू, पुढेपुढे, मागोमाग, हायहाय.

          कित्येक वेळा या द्विरुक्त शब्दांच्या मागे च, चे, च्या, ल्या, अशांसारखे प्रत्यय येऊन अतिशयत्व, सूचित केलेले असते.

उदा. 

पैसाचपैसा, लांबचलांब, वरचेवर, वरच्यावर, वरल्यावर, मधल्यामधे, खालच्याखाली, आतल्या आत.


(२) अंशाभ्यस्त शब्द

        जेव्हा शब्द तसाच पुन्हा न येता त्यातील एखादे अक्षर बदलून केवळ निरर्थक अक्षरे वापरून यमक साधण्याचा प्रयत्न असतो. 

उदा. -

शेजारीपाजारी, झाडबीड, बारीकसारीक, उरलासुरला, आडवातिडवा, अर्घामुर्धा, अघळपघळ, दगडबिगड, गोडधोड, किडूकमिडूक, घरबीर, उद्याबिद्या.

        केव्हा केव्हा पहिल्या नामाच्या अर्थाचेच दुसरे नाम जोडून द्विरुक्ती होते. हा शब्द समानार्थक शब्दांचा समास असतो. 

उदा. कागदपत्र, कामकाज, कपडालत्ता, बाजारहाट, साजशृंगार, बाडबिस्तरा.

  समानार्थक शब्दांत विशिष्ट भाषा समावेश असतो

उदा. 

(१) (फार्शी + फार्शी) 

अक्कलहुशारी, डावपेच, जुलूमजबरी.

(२) (फार्शी मराठी) 

अंमलबजावणी, कागदपत्र, खर्चवेच, मेवामिठाई, बाजारहाट

(३) (मराठी + फार्शी) 

दंगामस्ती, थट्टामस्करी, धनदौलत, मानमरातब, रीतरिवाज


(३) अनुकरणवाचक शब्द

         काही शब्दांत एखाद्या ध्वनिवाचक शब्दाची पुनरुक्ती साधलेली असते. 

उदा.

बडबड, किरकीर, गुटगुटीत, कडकडाट, गडगडाट, फडफड, खदखदून, तुरुतुरू, लुट्लट्, चुटचुट, गडगड, वटवट.

मंगळवार, १९ ऑक्टोबर, २०२१

समास

 मराठी व्याकरण 

समास व समासाचे उपप्रकार 

सामासिक शब्दांतील दोन पदांपैकी कोणत्या पदाला प्राधान्य आहे, यावरून समासाचे चार प्रकार पडतात.

           समासाचे नाव    -  पद प्राधान्य

(१) अव्ययीभाव समास - पहिले पद प्रधान

(२) तत्पुरुष समास - दुसरे पद प्रधान

(३) द्वंद्व समास - दोन्ही पदे प्रधान

(४) बहुव्रीही समास - दोन्ही पदांतून तिसऱ्याच पदाचा बोध होतो.


(१) अव्ययीभाव समास

(२) तत्पुरुष समास

     (अ) विभक्ती तत्पुरुष समास

     (आ) अलुक तत्पुरुष समास,श

     (इ) उपपद तत्पुरुष समास

     (ई) नञतत्पुरुष समास

     (उ) कर्मधारय समास

     (ऊ) द्विगू समास

    (ए) मध्यमपदलोपी समास

(३) द्वंद्व समास

      (अ) इतरेतर  द्वंद्व

     (आ) वैकल्पिक द्वंद्व

      (इ) समाहार द्वंद्व

(४) बहुव्रीही समास

      (अ) विभक्तिबहुव्रीही

      (आ) नञबहुव्रीही समास

      (इ)सहबहुव्रीही समास

      (ई) प्रादिबहुव्रीही समास


 समास :-

         बोलताना बर्‍याच वेळा दोन वेगळे शब्द एकत्र करुन बोलत असतो, शब्द एकत्र करत असताना त्या दोन शब्दांशी संबंधित विभक्ती प्रत्यय, तसेच इतर शब्द गाळून एक शब्द तयार करतो,  दोन शब्दांच्या अशा एकत्रीकरणाला 'समास' असे म्हणतात.

सामासिक शब्द :-

          अशा प्रकारे एकत्रीकरणाने जो शब्द तयार होतो तो 'सामासिक शब्द' असतो.

'सामासिक शब्दाचा विग्रह' :-

           सामासिक शब्द कोणत्या शब्दांपासून तयार झाला हे स्पष्ट करण्यासाठी आपण त्याची फोड (विग्रह) करून दाखवतो.

पद :-

    सामासिक शब्द ज्या दोन शब्दांनी बनला आहे, त्या प्रत्येक शब्दाला 'पद' असे म्हणतात.

उदा. 

सामासिक शब्द     -      विग्रह

(१) ज्ञानामृत - ज्ञानरूपी अमृत / ज्ञान हेच अमृत

(२) घरोघर - प्रत्येक घरी

(३) अहोरात्र - अह (दिवस) आणि रात्र

(४) जितेंद्रिय - जिंकली आहेत इंद्रिये ज्याने असा तो


समासाचे प्रकार व उपप्रकार

(१) अव्ययीभाव समास :-

         पहिले पद बहुधा अव्यय असते,

         पहिले पद महत्त्वाचे (प्रधान) असते,

         वाक्यात वापर क्रियाविशेषणासारखा केलेला असतो, 

उदा. 

१) दारोदार - प्रत्येक दारी 

२) आजन्म - जन्मापासून 

३) यथाशक्ती - शक्तीप्रमाणे

४) प्रतिदिन - प्रत्येक दिवशी 

५) प्रतिक्षण - प्रत्येक क्षणाला

       दररोज, हरहमेश, बिनधोक, बेलाशक, गैरशिस्त, बरहुकूम, दरमजल, बिनशर्त, बेमालूम, गैरहजर, गावोगाव, जागोजाग, गल्लोगल्ली, रात्रंदिवस, पदोपदी, घरोघर, दारोदार, मस्तोरस्ती, दिवसेंदिवस, पावलोपावली. 


(२) तत्पुरुष समास

         दुसरे पद महत्त्वाचे असते,

         विग्रह करताना अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्तिप्रत्यय घालावा लागते 

उदा. 

१) राजाज्ञा - राजाची आज्ञा

२) अष्टांग - आठ अंगांचा समूह

३) पुरूषोत्तम - उत्तम असा पुरुष


तत्पुरुष समासाचे तीन उपप्रकार

(अ) विभक्ती तत्पुरुष समास

         सामासिक शब्दातील पहिले पद नाम किंवा विशेषण असते.

         विग्रह करताना नामांना विभक्ती प्रत्ययांऐवजी काही वेळा शब्दयोगी अव्यये वापरली जातात, ती अव्यये विभक्तीचे कार्य करतात.


विभक्ती प्रत्ययांवरुन त्याच्या प्रकारांची ओळख होते

१) द्वितीया विभक्ती तत्पुरुष समास - ला, ना, स

उदा. 

        लोकप्रिय - (लोकांना प्रिय)

        कृष्णाश्रित, देशगत.


२) तृतीया विभक्ती तत्पुरुष समास - ने

उदा. 

          कष्टसाध्य - (कष्टाने साध्य)

          तोंडपाठ, गुणहीन, चौपट, ईश्वरनिर्मित, बुद्धिजड.


३) चतूर्थी विभक्ती तत्पुरुष समास - साठी, करीता

उदा. 

           नाट्यगृह - (नाट्यासाठी गृह)

            गायरान, पोळपाट, वाटखर्च, मेंढवाडा, पूजाद्रव्य, बाइलवेडा, व्याहीभोजन.


४) पंचमी विभक्ती तत्पुरुष समास - पासून

उदा. 

            चोरभय - चोरापासून भय

             सेनानिवृत्त, गर्भश्रीमंत, जातिभ्रष्ट, चोरभय, जन्मखोड, लंगोटीमित्र.


५) षष्ठी विभक्ती तत्पुरुष समास - चा, च, चे

उदा. 

         घरमालक - घराचा मालक

         देवपूजा, राजवाडा, घोडदौड, लक्ष्मीकांत, धर्मवेड, आंबरा, भूपती, विद्याभ्यास.


६) सप्तमी विभक्ती तत्पुरुष समास - तील

उदा.

          वनभोजन - वनातील भोजन

           स्वर्गवास, पोटशूळ, वनभोजन, कूपमंडूक, घरधंदा, कलाकुशल, पाणकोंबडा.


(आ) अलुक तत्पुरुष समास :- (अलुक् = लोप न होणारे)

          पूर्वपदाच्या (पहिल्या पदाच्या) विभक्तिप्रत्ययाचा लोप होत नाही.

उदा. तोंडीलावणे

       अग्रेसर, युधिष्ठिर, पंकेरूह, कर्तरिप्रयोग, कर्मणिप्रयोग

       या सामासिक शब्दातील पहिली पदे 'अग्रे, युधि, पंके, कर्तरि, कर्मणि' ही आहेत, या पहिल्या पदांच्या विभक्ती प्रत्ययांचा लोप झालेला नाही.


(इ) 'उपपद' किंवा 'कृदन्त' तत्पुरुष समास :- 

        समासातील दुसरे पद महत्त्वाचे असते,

        दुसरे पद धातुसाधिते किंवा कृदंन्त असतात,

        या कृदंन्तांचा वाक्यात स्वतंत्रपणे उपयोग करता येत नाही.

उदा.

१) पंकात - (चिखलात) जन्मणारे ते)

२) जलद - (जल देणारे)

३) ग्रंथकार - (ग्रंथ लिहीणारा )

४) कुंभकार  - (कुंभ घडविणारा)

५) पांथस्थ - स्थ (राहणारा)

६) शेषशायी - शायी (निजणारा) 

      मार्गस्थ, दिन, विहण,  देशस्थ, मनुज, नृप, सुखद, पयोद, खग, नग, सुश, कृतघ्न, शेतकरी, कामकरी, आगलाव्या, भाजीविक्या, वाटसरू, पंकेरू.


(ई) नञ तत्पुरुष समास :-

       शब्दांतील दुसरी पढ़े महत्त्वाचे असते,

       पहिले पद नकारार्थी असते,

        पहिली पदे 'अ, अन्न, ना. वे. नि. गैर' यांसारखी अभाव किंवा निषेध दर्शविणारी असतात.

उदा.

१) अयोग्य - (योग्य नव्हे ते)

२) अनादर - (आदर नसलेला)

३) नापसंत - ( पसंत नसलेला)

        अनाचार, अन्याय, अहिंसा, निरोगी, नाइलाज, नाउमेद, बेडर, गैरहजर


(उ) कर्मधारय समास

      दोन्ही पदे एकाच प्रथमा विभक्तीत असतात,

      पहिले पद विशेषण असून दुसरे पद नाम असते,

     दोन्ही पदांतील संबंध विशेषण-विशेष्य किंवा उपमान-उपमेय अशा स्वरूपाचा असतो.

उदा. 

१) महादेव (महान असा देव)

२) घनश्याम (घनासारखा श्याम) 

३) रक्तचंदन (रक्तासारखे चंदन), 

४) मुखकमल (मुख हेच कमल) 

 

उपप्रकार

(१) दोन्ही पदे एकाच विभक्तीत (प्रथमा विभक्तीत)

उदा. १) मुखचंद्रमा


(२) पूर्व पद विशेषण - (पहिले पद विशेषण) 

उदा. १) पीतांबर (पिवळे असे वस्त्र)

       कृष्णविवर रक्तचंदन, नीलकमल


(३) उत्तर पद विशेषण - (दुसरे पद विशेषण)

उदा.

१) घननीळ - (निळा असा घन)

२) पुरुषोत्तम - (उत्तम असा पुरुष)

३) भाषान्तर - (अन्य भाषा)

४) वेशान्तर - (अन्य वेश) 


(४) विशेषण-उभयपद - (दोन्ही पदे विशेषणे) 

उदा. पांढराशुभ्र, श्यामसुंदर, लालभडक, हिरवागार, काळाभोर


(५) उपमान पूर्वपद - पहिले पद (पूर्व) उपमान

उदा. 

१) कमलनयन (कमळासारखे डोळे), 

२) मेघश्याम (मेघासारखा काळा), 

३) चंद्रमुख (चंद्रासारखे मुख) 


(६) उपमान-उत्तरपद - (दुसरे पद उपमान)

उदा. 

      १) नरसिंह (सिंहासारखा नर)

      मुखचंद्र, चरणकमल, 


(७) रूपक-उभयपद- (दोन्ही पदे एकरूप)

 उदा. 

१) विद्याधन  (विद्या हेच धन) 

२) काव्यामृत (काव्यरूपी अमृत), 

        भवसागर, विद्युल्लता, चरणकमल


(ऊ) द्विगू समास :-

     दुसरे पद महत्त्वाचे असते,

     पहिले पदे संख्याविशेषण असते,

     सामासिक शब्दांवरून एक समूहाचा बोध होतो.

उदा. 

(१) पंचवटी - (पाच वडांचा समूह) 

(२) नवरात्र - (नऊ रात्रींचा समूह)

(३) चातुर्मास - (चार मासांचा समूह)

(४) त्रिभुवन - (तीन भुवनांचा समूह)

(५) दशदिशा - (दहा दिशांचा समूह)

(६) सप्ताह - (सात अहांचा ( दिवसांचा) समूह)

उदा. त्रिदल, पंचपाळे, चौघडी, त्रैलोक्य, बारभाई, पंचारती.


(ए) मध्यमपदलोपी समास :-

        पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध दाखविणारी मधली काही पदे लोप होतो, 

        विग्रह करताना 'युक्त, द्वारा, पुरता, असलेला अशांसारखी गाळलेली पदे घालावी लागतात.

उदा.

१) कांदेपोहे - (कांदे घालून केलेले पोहे).

२) साखरभात - (साखर घालून केलेला भात).

३) चुलतसासरा - (नवऱ्याचा चुलता या नात्याने सासरा).


(३) द्वंद्व समास

             दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान म्हणजे समान दर्जाची असतात.

उदा. 

     १) पतीपत्नी - पती आणि पत्नी

     २) गप्पागोष्टी - गप्पा किंवा गोष्टी


विग्रहच्या पद्धतीवरून या समासाचे तीन प्रकार पडतात :

(अ) इतरेतर द्वंद्व समास :- (आणि', 'व')

      अर्थासाठी दोन्ही पदांची अपेक्षा असते

      विग्रह करताना ‘आणि', 'व' यांपैकी एक समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय वापरतात.

उदा.

१) विटीदांडू - विटी आणि दांडू

२) घरदार - घर आणि दार

३) भलेबुरे - भले आणि बुरे

४) कुलूपकिल्ली - कुलूप आणि किल्ली

५) मायलेक - माय आणि लेकरे


(आ) वैकल्पिक द्वंद्व समास :- ('किंवा', 'अथवा', 'वा')

       दोन्ही प्रधान पदांपैकी एकाचीच अपेक्षा असते.

       विग्रह करताना 'किंवा', 'अथवा', 'वा' यांपैकी एक विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय वापरतात.

उदा.

 १) खरेखोटे - (खरे किंवा खोटे)

२) इष्टानिष्ट - (इष्ट किंवा निष्ट)

३) लहानमोठे - लहान किंवा मोठे


(इ) समाहार द्वंद्व समास :-

        विग्रह करताना त्यातील दोन्ही मूळ पदांच्या बरोबर त्याच जातीच्या इतर पदार्थांचा वस्तूंचा समावेश होत असतो.

उदा.

१) अंथरूणपांघरूण - (अंथरण्यासाठी व पांघरण्यासाठी लागणाऱ्या इतर वस्तू)


(४) बहुव्रीही समास :-

       दोन्ही पदे महत्त्वाची नसतात,

       दोन्ही पदांमधून तिसऱ्याच पदाचा बोध होतो,

       हा सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण असते.

उदा.

१) नीळकंठ - निळा आहे कंठ ज्याचा - (शंकर) 


(अ) विभक्तिबहुव्रीही समास :-

      विग्रह करताना शेवटी एक संबंधी सर्वनाम येते.

      संबंधी सर्वनाम ज्या विभक्तीत असते तिचेच नाव या समासाला देतात.

उदा.

१) लक्ष्मीकांत - लक्ष्मी आहे कान्ता ज्याची तो (षष्ठी)

२) गजानन - गजाचे आहे आनन ज्याला तो (चतुर्थी)

३) जितेन्द्रिय - जित् (जिंकली) आहेत इंद्रिये ज्याने तो (तृतीया) 


विभक्तिबहुव्रीहीचे प्रकार :

    क) समानाधिकरण बहुव्रीही

    ख) व्यधिकरण बहुव्रीही


क) समानाधिकरण बहुव्रीही :-

        विग्रह करताना त्यातील दोन्ही पदे जेव्हा कोणत्याही एकाच विभक्तीत असतात.

उदा.

१) भक्तप्रिय - भक्त आहे प्रिय ज्याला तो (देव)

२) जितेंद्रिय - जित (जिंकलेली) आहेत इंद्रिये ज्याने तो (मारुती)


ख) व्यधिकरण बहुव्रीही :-

        विग्रह करताना त्यातील दोन्ही पदे जेव्हा कोणत्याही भिन्न किंवा वेगवेगळ्या विभक्तीत येतात. 

 उदा.

१) पद्मनाभ - पद्म आहे नाभीत (म्हणजे बेंबीत) ज्याच्या तो (विष्णु)

२) चक्रपाणी - चक्र आहे पाणीत म्हणजे हातात ज्याच्या तो (विष्णु)


(आ) नञ्बहुव्रीही समास :-

        पहिले पद 'अ, अन, न, नि' असे नकारदर्शक असते

उदा. 

१) अनंत - नाही अंत ज्याला तो (परमेश्वर)

२) नीरस - नाही रस ज्यात ते (काव्य)

३) अव्यय, अनेक, नपुंसक, अनादी, निर्धन, निःशब्द, निरोगी


(इ) सहबहुव्रीही समास :-

        पहिली पदे 'सह' किंवा 'सह अशी अव्यये असतात. 

         मात्र हा सामासिक शब्द विशेषण नसते.

उदा. 

१) सादर - आदराने सहित असा जो (नमस्कार)

२) सहकुटुंब - कुटुंबाने सहित असा जो (गृहस्थ)

      सनाथ, सहपरिवार, सुपुत्र, सफल, सरूप, सुवर्ण, सचैल, सानंद, सबल.


(ई) प्रादिबहुव्रीही समास :-

       पहिले पद 'प्र, परा, अप, दुर्, सु, वि' अशा उपसर्ग 

युक्त असते. 

(प्रादि = प्र आदि असलेले) 

उदा. सुलोचना, निर्धन, विरागी, दुर्गुणी, प्राज्ञ



Next Post : मराठी व्याकरण - शब्दसिध्दी

रविवार, १७ ऑक्टोबर, २०२१

संधी - स्वरसंधी

 मराठी व्याकरण 

संधी - स्वरसंधी

पूर्वज्ञान :

           संधींचा अभ्यास करताना मराठीतील वर्णमालेतील स्वर व व्यंजन यांची ओळख असणे आवश्यक आहे.

संधी

संधी होताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये मिसळतात व त्या दोहोंबद्दल एक वर्ण तयार होतो. अशा दोन वर्णांच्या एकमेकांमध्ये एकत्र मिसळण्याच्या प्रकारास 'संधी' असे म्हणतात.

संधींचे प्रकार

स्वरसंधी :- स्वर + स्वर 

           एकमेकांशेजारी येणारे वर्ण हे जर स्वराने जोडले असतील तर त्यांना स्वरसंधी असे म्हणतात.

उदा. कवि + ईश्वर = (इ + ई = ई) = कवीश्वर.

व्यंजनसंधी :- 

व्यंजन + व्यंजन किंवा व्यंजन + स्वर 

        एकमेकांशेजारी येणाऱ्या या दोन वर्णापैकी दोन्ही वर्ण व्यंजने असतील किंवा पहिला वर्ण व्यंजन व दुसरा वर्ण स्वर असेल तर त्याला व्यंजनसंधी असे म्हणतात. 

उदा. 

सत् + जन = (तू + ज्) = सज्जन,

चित् + आनंद = (त् + आ) = चिदानंद


विसर्गसंधी

विसर्ग व्यंजन किंवा विसर्ग + स्वर 

           एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तेव्हा त्यास विसर्गसंधी असे म्हणतात. 

उदा. 

तपः + धन = तपोधन (विसर्ग + ध्)

दु: + आत्मा = दुरात्मा = (विसर्ग आ)


स्वरसंधी :-

(१) सजातीय स्वरसंधी :-

पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण 'र्हस्व' स्वर किंवा 'दीर्घ' स्वर असल्यास व दुसऱ्या शब्दाचा पहिला अक्षराचा स्वर हा त्याच प्रकारचा स्वर 'हस्व' स्वर किंवा 'दीर्घ' स्वर असल्यास त्या दोघांतून निर्माण होणारा स्वर त्याच जातीतील एकच दीर्घ स्वर असतो तो सजातीय स्वर संधी होय. 

        1.    र्‍हस्व  + र्‍हस्व = दीर्घ

2.    र्‍हस्व + दीर्घ = दीर्घ

        3.    दीर्घ + र्‍हस्व = दीर्घ

उदा.

पोटशब्द       एकत्र येणारे स्वर      जोडशब्द

१) सूर्य + अस्त = (अ + अ = आ) = सूर्यास्त

२) देव + आलय = (अ + आ = आ) = देवालय

३) विद्या + अर्थी = (आ + अ = आ) = विद्यार्थी

४) महिला + आश्रम =(आ + आ = आ)= महिलाश्रम

५) मुनि + इच्छा = (इ + इ = ई) = मुनीच्छा 

६) गिरि + ईश = (इ + ई = ई) = गिरीश

७) मही + ईश = (ई + ई = ई) = महीश

८) गुरु + उपदेश = (उ + उ = ऊ) = गुरुपदे

९) भू + उद्धार = (ऊ + उ = ऊ) = भूद्धार


(२) गुणादेश

१) 'अ' किंवा 'आ' यांच्यापुढे 'इ' किंवा 'ई' आल्यास त्या दोहोंऐवजी 'ए' येतो.

उदा.

पोटशब्द       एकत्र येणारे स्वर      जोडशब्द

ईश्वर इच्छा = (अ + इ = ए) = ईश्वरेच्छा

गण ईश = (अ + ई = ए) = गणेश

उमा ईश = (आ + ई = ए) = उमेश

२) 'अ' किंवा 'आ' यांच्यापुढे 'उ' किंवा 'ऊ' आल्यास 'ओ' येतो.

उदा.

पोटशब्द       एकत्र येणारे स्वर      जोडशब्द

चंद्र + उदय = अ + उ =ओ चंद्रोदय

महा+ उत्सव = आ + उ =ओ महोत्सव

३) 'अ' किंवा 'आ' यांच्यापुढे 'ऋ' आल्यास त्या दोहोंऐवजी अर् येतो.

उदा.

पोटशब्द       एकत्र येणारे स्वर      जोडशब्द

देव + ऋषी = अ + ऋ = अर्  देवर्षी

महा+ ऋषी = आ + ऋ = अर  महर्षी


३) वृद्ध्यादेश

१) पहिल्या शब्दातील शेवटच्या अक्षरात 'अ' किंवा 'आ' स्वर आले व त्यापुढे दुसर्‍या शब्दात पहिले अक्षर 'ए', 'ऐ' असे वर्ण आले असता 'ऐ' हा स्वर तयार होतो.

उदा. 

पोटशब्द         स्वर व संधी       जोडशब्द

एक + एक = (अ + ए = ऐ) = एकैक

मत + ऐक्य = (अ + ऐ = ऐ) = मतैक्य

प्रजा + ऐक्य = (आ + ऐ = ऐ)  = प्रजैक्य

सदा + एव = (आ+ ए = ऐ) = सदैव


२) पहिल्या शब्दातील शेवटच्या अक्षरात 'अ' किंवा 'आ' स्वर आले व त्यापुढे दुसर्‍या शब्दात पहिले अक्षर या स्वरापुढे 'ओ' किंवा 'औ' हे स्वर आल्यास त्या दोहोंबद्दल 'औ' हा स्वर येतो.

उदा. 

पोटशब्द         स्वर व संधी       जोडशब्द

जल + ओघ = (अ +ओ = औ) = जलौघ

गंगा +ओघ = (आ + ओ = औ) = गंगौघ


४) यणादेश :-

 'इ', 'उ' व 'ऋ' यांबद्दल अनुक्रमे 'य', 'व', 'र्' असे आदेश होतात. त्यांना 'यणादेश' (यण् + आदेश) असे म्हणतात. 

१) पहिल्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरात 'इ' स्वर असेल व दुसऱ्या शब्दाच्या पहिल्या अक्षरात त्याच प्रकारचा दीर्घ विजातीय स्वर 'ई' आला तर त्या दोहों (इ+ई) बदल 'य 'हा वर्ण येतो व दुसऱ्या शब्दाच्या पहिल्या अक्षरातील स्वर मिसळतो. 

उदा.

पोटशब्द       स्वर व संधी           जोडशब्द

१) प्रीती + अर्थ = (इ+अ=य् +अ=य) = प्रीत्यर्थ

२) इति + आदी = (इ+आ=य्+आ=या) = इत्यादी

३) अति + उत्तम = (इ+उ=य्+उ=यु) = अत्युत्तम

४) प्रति + एम = (इ+ए=यू+ए=ये) = प्रत्येक


२) पहिल्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरात 'उ' असेल व दुसऱ्या शब्दाच्या पहिल्या अक्षरात त्याच प्रकारच्या दीर्घ विजातीय स्वर 'ऊ' आला त्या दोहों (उ+ऊ) बदल 'व' हा वर्ण येतो व दुसऱ्या शब्दाच्या पहिल्या अक्षरातील स्वर मिसळतो.

उदा.

१) मनु + अंतर = (उ + अ = व् + अ = व) = मन्वंतर

२) सु+ अल्प = (उ + अ = व् + अ = व)= स्वल्प


३) पहिल्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरात 'ऋ' असेल तर त्याचा 'र' वर्ण होतो व दुसऱ्या शब्दाच्या पहिल्या शब्दातील स्वर मिसळतो.

१) पितृ + आज्ञा = (ऋ + आ + आ = रा) = पित्राज्ञा


(५) संप्रसारण :- 

पहिल्या शब्दाच्या शेवटची अक्षरे य, व, र् वर्ण असतील तर  'य' यांच्याबद्दल 'इ', 'व' यांच्याबद्दल 'उ', 'र्' यांच्याबद्दल 'ऋ' आल्यास त्याला 'संप्रसारण' म्हणतात.

 उदा. 

१) येथे = इथे, 

२) नव = नऊ, 

३) गायी = गाई. 

४) सोयी = सोई.


(६) पहिल्या शब्दाच्या शेवटी 'ए', 'ऐ', 'ओ', 'औ' हे स्वर आले तर दुसऱ्या शब्दाच्या पहिल्या अक्षरात 'अ', 'ई' हे स्वर आले तर त्याबद्दल 'अय', 'आय', 'अवी', 'आवि' असे वर्ण येतात.

उदा. 

पोटशब्द       स्वर व संधी           जोडशब्द

ने + अन  = (ए + अ = अय् +अ = अय) = नयन

गै + अन = (ए + अ = आय् + अ = आय) = गायन

गो + ईश्वर = (ओ + ई = अव् + ई = अवी) = गवीश्वर

नौ + इक = (औ + ई = आव् + इ = आवि) = नाविक


Next post  :  मराठी व्याकरण - समास 

शनिवार, १६ ऑक्टोबर, २०२१

संधी - विसर्गसंधी

 मराठी व्याकरण 

 संधी - विसर्गसंधी

         'विसर्ग' हा स्वतंत्र स्वर नसून तो 'स्वरादी' आहे त्यामुळे कोणत्या तरी स्वरानंतर तो येतो. 

          विसर्गसंधी मध्ये एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला वर्ण विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असतो तेव्हा त्याला विसर्गसंधी असे म्हणतात.

प्रकार व नियम 

(१) विसर्ग उकार संधी

पोटशब्द एकत्र येणारे स्वर, विसर्ग व संधी

शब्दांमध्ये, शेवटी विसर्गाच्या मागे 'अ' हा स्वर आला असता (अविसर्ग = अः) दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण मृदू व्यंजन आला त्यामुळे विसर्गाचा 'उ' झाला  व तो मागील 'अ' मध्ये मिसळून. (अ+उ =ओ) त्याचा 'ओ' स्वर होऊन तो त्यातील व्यंजनामध्ये मिसळतो.

उदा. 

पोट शब्द               संधी                   जोडशब्द

१) यश: + धन = 

   श + अ + : + धन + श् + ओ + धन = यशोधन

२) मनः+रंजन = 

  न् + अ + : + रंजन = न् + ओ + रजन = मनोरंजन

३) अधः वंदन =

  ध् + अ + : +  वदन = ध् + ओ + वंदन = अधोवंदन

४) तेजः + निधी 

  ज् + अ + : + निधी = ज् + ओ + निधी = तेजोनिधी


(२) 'विसर्ग-र-संधी'

विसर्गाच्या मागे 'अ', 'आ' खेरीज कोणताही स्वर आला व पुढे मृदू वर्ण असेल तर या ठिकाणी विसर्गाचा 'र' होऊन तो पुढील वर्णात मिसळतो.

उदा. 

पोट शब्द           संधी             जोडशब्द

१) निः + अंतर

    (न) + इ + : + अं = नि + रं  = निरंतर

२) दुःजन 

   (द्) + उ + : + जन = (दु) + ज = दुर्जन

४) बहिः + अंग 

    (ह्) + इ + : + अं= (हि)+रं = बहिरंग

मात्र

       'विसर्ग-र-संधी'च्या नियमाप्रमाणे विसर्गाचा 'र' झाला पण दुसर्‍या शब्दाचे पहिले अक्षर सुध्दा 'र' हा वर्ण आल्यास त्या 'र' चा लोप होतो व त्याच्यामागील स्वर र्व्हस्व असल्यास दीर्घ होतो.

उदा. 

१) निः + रस = नि: + र्रस = नीरस,

२) निः + रख = निः + र्रव= नीरव


(३) पहिल्या शब्दाच्या शेवटी 'स' येतो व दुसर्‍या शब्दाचे पहिले अक्षर कोणतेही व्यंजन आल्यास 'स्' चा विसर्ग होतो.

उदा. 

१) मनस् + पटल = मनःपटल 

२) तेजस् + कण = तेजःकण


(४)  पहिल्या शब्दाच्या शेवटी 'र' येऊन व दुसर्‍या शब्दाचे पहिले अक्षर कठोर व्यंजन आल्यास त्या 'र' चा विसर्ग होतो.

उदा. 

१) अंतर् + करण = अंतःकरण

२) चतुर् + सूत्री = चतु:सूत्री 


(५) पहिल्या शब्दाच्या शेवटी विसर्गाच्या ऐवजी ' र्' आला व त्याच्या मागे 'अ' स्वर असल्यास व दुसर्‍या शब्दाचे पहिले अक्षर मृदू वर्ण आल्यास तो 'र' तसाच राहतो.

उदा. 

१) पुनर् + जन्म  = पुनर्जन्म

२) अंतर् + आत्मा = अंतरात्मा


(६) पहिल्या शब्दाच्या शेवटी विसर्गाच्या मागे 'अ' हा स्वर असेल व  दुसर्‍या शब्दाच्यापुढे क, ख, प, फ यांपैकी एखादे व्यंजन आले तर विसर्ग कायम राहतो. 

उदा. 

१) प्रातः + काल  = प्रातःकाल

२) तेज: + पुंज = तेज:पुंज

मात्र

पहिल्या शब्दाच्या शेवटी विसर्गाच्या मागे 'अ' हा स्वर असेल व   व दुसर्‍या शब्दाच्यापुढे अन्य स्वर आला तर विसर्ग लोप पावतो.

उदा. 

१) अतः + एव = अतएव

२) इत: + उत्तर = इतउत्तर


(७) पहिल्या शब्दाच्या शेवटी विसर्गाच्या मागे 'इ' किंवा 'उ' असेल व दुसर्‍या शब्दाचे पहिले अक्षर क, ख, प, फ यांपैकी कोणताही वर्ण आल्यास विसर्गाचा 'ष' होतो.

उदा. 

१) निः + कारण = निष्कारण

२) निः + पाप = निष्पाप

३) दु: + परिणाम = दुष्परिणाम

४) दुः + कृत्य = दुष्कृत्य

५) दु: + कीर्ती = दुष्कीर्ती

६) बहि: + कृत = बहिष्कृत

 (अपवाद- दुः + ख =  दुःख, निः + पक्ष = निःपक्ष) 


(८) पहिल्या शब्दाच्या शेवटी विसर्ग असतो व दुसऱ्या शब्दाचे पहिले अक्षर 'च्', 'छ्' असेल तर विसर्गाचा 'श्' होतो आणि 'त्', 'थ्' आल्यास विसर्गाचा 'स' होतो.

उदा. 

१) निः + चल = निश्चल

२) दुः + चिन्ह = दुश्चिन्ह

३) मनः + ताप = मनस्ताप

४) निः + तेज = निस्तेज


(९) पहिल्या शब्दाच्या शेवटी विसर्गा असतो व पुढे दुसऱ्या शब्दाचे पहिले अक्षर 'श', 'स्' आल्यास विसर्ग विकल्पाने कायम राहतो; किंवा लोप पावतो. 

उदा. 

१) दुः + शासन = दुःशासन (दुश्शासन)

२) निः + संदेह = निःसंदेह (निस्संदेह)


मराठीचे विशेष संधी

१) पूर्वरूप संधी 

               दोन स्वर एकापुढे एक आले असता त्यांतील पहिला शब्दातील स्वर (= पूर्व स्वर) न बदलता तसाच राहतो व दूसर्या शब्दातील स्वर लोप पावतो.

उदा. 

१. काही + असा = काहीसा,

२. खिडकी + आत = खिडकीत

३. किती + एक = कितीक

४. केले + असे = केलेसे

५. नदी + आत = नदीत

६. लाडू + आत = लाडूत


२) पररूप संधी 

                जेव्हा पहिल्या शब्दातील शेवटचा स्वर लोप पावतो व दुसर्‍या शब्दातील स्वर (= पर स्वर) कायम राहतो.

उदा. 

१. घर + ई = घरी

२. घाम + ओळे = घामोळे

३. एक + एक = एकेक,

४. न + उमजे = नुमजे,

५. कर + उन = करून

६. सांग + एन = सांगेन


३) दीर्घ स्वरापुढे येणाऱ्या स्वराचा मागील स्वराशी बहुतकरून संधी होत नाही.

उदा.

१. जा + ऊन = जाऊन

२. घे + ईल = घेईल

३. हो + ऊ = होऊ


४) 'ही' या शब्दयोगी अव्ययाचा संख्याविशेषणाशी दोन प्रकारांनी संधी होतो.

(अ) 'ह' चा लोप न होता जसे - दोन + ही दोन्ही 

(तिन्ही, चार्ही)

(ब) 'ह' चा लोप होऊन जसे - दोन + ही = दोनी

(तिनी, चारी)


५) 'अनुरूप', 'अनुसार' यांसारखे शब्द जोडताना मागील शब्दाचे सामान्यरूप होऊन मग पूर्वरूप संधी होतो.

उदा. 

१. गरज + अनुरूप = गरजेनुरूप, 

२. पद्धती + अनुसार = पद्धतीनुसार


(६) संधी हे तत्सम शब्दांत होतात. तरीही बोलण्याच्या ओघात मराठीत काही शब्द एकमेकांत मिसळून नवीन रूपे तयार होतात.

उदा. 

१. येतो + आहे = येतोहे, येतोय

२. गेली + आहे= गेलीहे, गेलीय 

३. बसला + आहात = बसलाहात = बसलात

शुक्रवार, १५ ऑक्टोबर, २०२१

संधी - व्यंजनसंधी

 मराठी व्याकरण 

संधी - व्यंजनसंधी 

               व्यंजनसंधी प्रकारामध्ये जवळ येणाऱ्या शब्दांतील दोन वर्णांपैकी दोन्ही व्यंजने असतील किंवा पहिला वर्ण व्यंजन व दुसरा वर्ण स्वर असेल तेव्हा त्याला व्यंजनसंधी असे म्हणतात. 

व्यंजन + व्यंजन 

व्यंजन + स्वर 

व्यंजनसंधी संबंधीचे नियम

(१) प्रथम व्यंजन संधी

पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण हा पहिल्या पाच वर्गांपैकी अनुनासिकाशिवाय असणारे व्यंजन असते (क, ख, ग, घ, च, छ, ज, झ, ट, ठ, ड, ढ, त, थ, द, ध, प, फ, ब, भ) व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण कठोर व्यंजन असते, (क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ) संधी होताना पहिल्या व्यंजनाच्या ठिकाणी त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन (क, च, ट, त, प) येऊन संधी झाला आहे.

शेवटचे अक्षर पहिल्या पाच वर्गातील अनुनासिकाशिवाय वर्ण + पहिले अक्षर कठोर वर्ण = त्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन

पोट शब्द                          संधी                   जोडशब्द

विपद् + काल   =    द् + क् = त् + क् = त्क     विपत्काल

वाग् + पती      =    ग् + प् = क् + प् = क्प      वाक्पती 

वाग् + ताडन   =     ग् + त् = क् + त् = क्त       वाक्ताडन

षड् + शास्त्र    =    ड् + श् = ट् + श् = ट्श       षट्शास्त्र 

क्षुघ् + पिपासा  =  ध् + प् = त् + प् = त्प         क्षुत्पिपासा


(२) तृतीय-व्यंजन संधी  

पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण पहिल्या पाच वर्गांतील कठोर (क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ)  वर्ण असेल व त्याच्यापुढे पुढील शब्दातील पहिला वर्ण अनुनासिकाशिवाय स्वर (अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ) किंवा मृदू व्यंजन (ग, घ, ज, झ, ड, ढ, द, ध, ब, भ)  आले तर संधी होताना पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन (ग, ज,  ड,  द, ब) येऊन संधी होतो.

शेवटचे अक्षर कठोर वर्ण + पहिले अक्षर स्वर किंवा मृदू व्यसन = तिसरे व्यंजन

पोट शब्द                           संधी                   जोडशब्द

वाक् + ईश्वरी           क् + ई = ग् + ई = गी         वागीश्वरी

वाक् + विहार          क् + व् = ग् + व् =ग्व          वाग्विहार

षट् + रिपू               ट् + र् = ड् + र = ड्र             षड्रिपू

सत् + आचार         तू + आ = द् + आ = दा         सदाचार

अच् + आदी           च् + आ = ज् + आ = जा      आजादी 

 अप् + ज               प् +  ज् =  ब् + ज् = ब्ज       अब्ज


(३) 'अनुनासिक संधी' 

पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण हा पहिल्या पाच वर्गांतील कोणतेही व्यंजन (क, ख, ग, घ, च, छ, ज, झ, ट, ठ, ड, ढ, त, थ, द, ध, प, फ, ब, भ) असेल व दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण अनुनासिक (ङ, ञ, ण, न, म) आल्यास पहिल्या शब्दाच्या व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील अनुनासिक व्यंजन (ङ, ञ, ण, न, म) येऊन संधी होतो. 

पोट शब्द                   संधी                   जोडशब्द

वाक् + निश्चय     क + नू = ङ् + न्         वाङनिश्चय

षट् + मास         ट् + म् = ण् + म          षण्मास

जगत् + नाथ      त् + न् =न् + न्            जगन्नाथ

सत् + मती        त् + म् = न्                  सन्मती


(४) त या व्यंजन पुढे च, छ, ज, झ, ट, ठ, ल, श, आल्यास खलील प्रमाणे बदल होतात

(१) च् छ् आल्यास त् बदल च्  होतो. 

सत् + चरित्र =    त् +  च् = च् + च्      =   सत्चरित्र

उत् + छेद   =     त् + छ् = च् + छ्    =     उच्छेद

(२) ज् झ् आल्यास त्  बदल ज्  होतो. 

सत् + जन     =    त् + ज् = ज् + ज्     =     सज्जन

(३) ट् ठ् आल्यास त् बद्दल ट् होतो. 

तत् + टीका    =    त् + ट्  =  ट् + ट्   =     तट्टीका

(४) ल् आल्यास त्  बद्दल ल् होतो. 

उत् + लंघन   =    त् + ल्  = ल्  + ल्   =    उल्लंघन

(५) श् आल्यास त् बद्दल च् होतो व श् बदल छ् होतो.

सत् + शिष्य।   =     त् + श् = च् + छ्    =   सच्छिष्य


(५) पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण 'म्' असेल आणि त्याच्या पुढील शब्दातील पहिले अक्षर स्वर आल्यास तो स्वर मागील 'म्' मध्ये मिसळून जातो.

सम् + आचार= समाचार

तसेच पुढील शब्दातील पहिले अक्षर व्यंजन 'म्' आल्यास मागील अक्षरावर अनुस्वार येतो.

सम् +  गती = संगती


(६) दुसऱ्या शब्दातील शेवटचा वर्ण 'छ्' असेल व त्यापूर्वी शब्दात शेवटचे अक्षर र्हस्व स्वर असेल तर त्या दोहोंमध्ये 'च्' हा वर्ण येतो.

रत्न छाया = रत्नच्छाया

शब्द + छल = शब्दच्छल

सामाजिक व राजकीय चळवळी इयत्ता १० वी विषय राज्यशास्त्र

  सामाजिक व राजकीय चळवळी ‘चळवळी’ का ? 1 समाजातल्या सर्वच व्यक्तींना राजकीय पक्षात सहभागी होऊन सार्वजनिक हितासाठी काही करणे शक्य असतेच अस...