मराठी व्याकरण : शब्दसिद्धी
भाषेतल्या शब्दाचे वर्गीकरण दोन प्रकारे करता येते.
(१) सिद्ध शब्द -
(अ) तत्सम
(आ) तद्भव
(इ) देशी
(ई) परभाषीय
(२) साधित शब्द -
(अ) उपसर्गघटित शब्द
(आ) प्रत्ययघटित शब्द
(इ) सामासिक शब्द
(ई) अभ्यस्त शब्द
शब्दसिद्धी म्हणजे मराठी भाषेमध्ये असलेल्या शब्दांच्या उगमाचा शोध घेणे होय.
शब्दसिद्धी म्हणजे
भाषेत आलेले शब्द कशा प्रकारे निर्माण झाले?
कोणत्या मूळ भाषेतून आले?
कोणत्या शब्दात बदल करून आपण नवीन शब्द घडवला ?
(१) सिद्ध शब्द
(अ) तत्सम शब्द -
(संस्कृत भाषेतून जसेच्या तसे आलेले शब्द).
संस्कृत भाषेतले असून जसेच्या तसे म्हणजे शब्दांच्या रूपात काही फरक न होता मराठी भाषेत आलेले शब्द.
उदा.
कवि, मधु, गुरु, पिता, पुत्र, कन्या, वृक्ष, पुरुष, सत्कार, समर्थन, उत्सव पुष्प, जल, प्रीति, भीति, कर, ग्रंथ, पृथ्वी, भूगोल, विद्वान, भगवान, परंतु, यद्यपि, यथामति, कर्ण, पर्ण, अरण्य, हस्त, मस्तक, कर्म, ओठ, अग्नि, नदी, कमल इ.
(आ) तद्भव शब्द : -
(मूळ संस्कृत शब्दांच्या रूपात बदल करून मराठीत आलेले शब्द)
उदा. :- संस्कृत - मराठी
कर्ण - कान, चक्र - चाक, अग्नि - आग, पर्ण - पान, विनती - विनंती, गृह - घर, पद - पाय, भ्रातृ - भाऊ, स्वसू - सासू, श्वशुर - सासरा, ग्राम - गाव, दुग्ध - दूध, ग्रास - घास, कोमल - कोवळा, ओष्ठ - ओठ, कर्म - काम, घर्म - घाम इ.
(इ) देशी किंवा देशज :- (मूळ मराठी शब्द)
महाराष्ट्रातील रहिवासींच्या बोली भाषेतील शब्द. असे मराठी शब्द जे तत्सम किंवा तद्भव किंवा परभाषीय नाहीत.
उदा.
झाड, दगड, धोंडा, पोडा, डोळा, डोके, हाड, पोट, गुडघा, बोका, रेडा, बाजरी, वांगे, लुगडे, झोप, खुळा, चिमणी, ढेकूण इ.
(ई) परभाषीय :-
त्याचे दोन उपप्रकार आहेत.
(अ) परकीय किंवा विदेशी शब्द
(ब) स्वदेशी शब्द
(अ) परकीय किंवा विदेशी शब्द :-
(अरबी, फारशी, इंग्रजी फ्रेंच, पोर्तुगीज, डच यासारख्या परकीय किंवा विदेशी शब्दांमधून आलेले शब्द)
उदा.
(१) इंग्रजी
टेबल, पेपर, मार्क, नंबर, टीचर, सर, मॅडम, ऑफिस, ट्रेन, रेल्वे, बस, तिकिट, ड्रायव्हर, मोटर, कंडक्टर, स्टेशन पोस्ट, कार्ड, पार्सल, नर्स, डॉक्टर, पेशंट, इंजेक्शन, हॉस्पिटल, शर्ट, पँट, बटन, बॅट, बॉल, ड्रेस, ग्लास इ.
(२) पोर्तुगीज
बटाटा, तंबाखू, पगार, बिजागरे, को, हापूस, फणस,
(३) फारशी
खाना, सामान, हकीकत, अत्तर, अब, पेशवा, पोशाख, सौदागर, कामगार, गुन्हेगार, फडनवीस
(४) अरबी
अर्ज, इनाम, हुकूम, मेहनत, जाहीर, मंजूर, शाहीर, साहेब, मालक इ.
(ब) स्वदेशी शब्द :-
भारतीय भाषेतील शब्द किंवा भारतातील परप्रांतीय भाषेतील शब्द.
इतर भारतीय भाषांमधून गुजराती, हिंदी, कानडी, तेलगू, तामिळी यांसारख्या भाषांमधून मराठीत आलेले शब्द.
उदा.
(१) कानडी :-
अण्णा, अक्का, ताई, अडकित्ता, भाकरी, तूप, कुंची, कांबळे, खलबत्ता, विळी, गुढी, किल्ली, गुंडी इ.
(२) गुजराती :-
घी, दादर, शेट, दलाल, डबा, रिकामटेकडा
(३) तामिळी :-
चिल्ली पिल्ली, सार, मठ्ठा -
(४) तेलगू :-
ताळा, अनरसा, किडूकमिडूक, शिकेकाई
(५) हिंदी :-
भाई, बेटा, बच्चा, मिलाप, तपास, दिल, और, बात, दाम, करोड इ.
(२) साधित शब्द -
मूळ धातूच्या किंवा शब्दाच्या मागे अथवा पुढे एक किंवा अनेक अक्षरे लावून जे शब्द बनतात ते साधित शब्द होय.
(अ) उपसर्गघटित शब्द
उपसर्ग :
मूळ धातूच्या किंवा शब्दाच्या मागे एक किंवा अनेक अक्षरे लावतात त्या अक्षरांना 'उपसर्ग' असे म्हणतात.
उपसर्ग अव्ययरूप असून स्वतंत्रपणे येत नाहीत.
ही अक्षरे उपसर्ग लागल्याने कधी कधी मूळ धातूचा अर्थ बदलतो.
उदा.
उपप्रमुख, उपवास अतिक्रम, अतिरेक, अतिप्रसंग अधिकरण, अध्ययन, अधिदैवत, अनुवाद, अनुमती, अनुस्वार, अपशब्द, अपशकुन, अपराध, अभ्युदय, अभिरुची, अभ्यास, अवगुण, अवनत, विसंगती, विपत्ती, विशेष, दुर्लभ, उत्तम, उत्प्रेक्षा, आक्रोश, उत्तीर्ण, उद्योग, उपकार, उपपद, परिपाठ, परिश्रम, आकर्ण, उपप्रमुख, पराभव, सुगम, सुशिक्षित, सुगंध, प्रतिध्वनी, प्रत्येक, प्रतिकूल, संगीत, संतोष ,संकल्प, प्रसिद्ध, प्रस्थान.
(आ) प्रत्ययघटित शब्द :-
प्रत्यय :-
शब्दाच्या किंवा धातूच्या पुढे एक किंवा अधिक अक्षरे लावतात, अशा अक्षरांना 'प्रत्यय' असे म्हणतात.
प्रत्यय लागून तयार झालेल्या शब्दाला 'प्रत्ययघटित' शब्द असे म्हणतात.
उदा.
आई - खोदाई, लढाई, चढाई
आऊ - टिकाऊ, जळाऊ, लढाऊ
आळू - झोपाळू, लाजाळू, दयाळू
दार - दुकानदार, जमीनदार
गिरी - गुलामगिरी, कारागिरी,
इक - मानसिक, सामाजिक, लौकिक
इत - आनंदित, प्रेरित
त्व - जडत्व, गुरुत्व
प्रत्ययघटित शब्द दोन प्रकारचे असतात.
(१) कृत् किंवा धातुसाधित
(२) तद्धित किंवा नामसाधित
(१) कृत् किंवा धातुसाधित
धातूंना प्रत्यय जोडून कृदन्त किंवा धातुसाधित शब्द तयार केला जातो.
(१) संस्कृत प्रत्यय :
(क, न, ना, नीय, आ, ई, इक, त, ता, व्य, ति, य)
उदा.
क - लेखक, रक्षक, पाचक,
न - नयन, चरण, बदन, नंदन, पालन,
ना - प्रार्थना, वेदना, कल्पना, तुलना, वंदना,
अनीय - श्रवणीय, मननीय, रमणीय, पूजनीय, वंदनीय,
आ - इच्छा, कथा, गुहा, चिंता
ई - हरि, त्यागी, भाषी.
इक - रसिक, पथिक.
त - कृत, मृत, व्यक्त, हत, नत, रत, भूत.
ता - त्राता, भर्ता, श्रोता, वक्ता, दाता, नेता, शास्ता,
व्य - कर्तव्य, श्रोतव्य, गन्तव्य, भवितव्य,
ति - कृति, स्तुति, नीति, युक्ति, शक्ति,
य - कार्य, देय, पेय, त्याज्य, भोग्य.
(२) मराठी प्रत्यय :
(अ, आ, आई, आऊ, आरी, आळू, ई, ईक, ईत, ईव ऊ, खोर, णावळ, प, पि, णारा, रा)
उदा.
अ - कर, डर, लूट, फूर, खोट, तूट, मेल, फोड,
आ - ओढा, ठेवा, झगडा, ठेचा, वेढा, पुकारा,
आई - खोदाई, चराई, पढाई, उजळाई, शिलाई
आऊ - टाकाऊ, जळाऊ, लढाऊ, विकाऊ, शिकाऊ.
आरी - पुजारी, पिंजारी, रंगारी,
आळू - झोपाळू, विसराळू, लाजाळू, सोसाळू
ई - कढी, मोडी, उडी, बुडी, रडी, थुंकी, बोली,
ईक - सडीक, पडीक, पढीक,
ईत - लखलखीत, चकचकीत,
ईव - रेखीव, जाणीव, कोरीव, घोटीव, पाळीव, आटीव.
ऊ - चालू, लागू, झाडू, उतारू
ऊन - करून, देऊन, बसून, उडून, रडून, हसून,
खोर - भांडखोर, चिडखोर,
णावळ - धुणावळ, लिहिणावळ, दळणावळ
प - दळप, कांडप, वाढप,
पी - वाढपी, दळपी, कांडपी,
णारा - लिहिणारा, बोलणारा.
रा - हसरा, नाचरा, बुजरा, दुखरा, तारक, मारक, गायक
(२) तद्धित किंवा नामसाधित, शब्दसाधित :-
नामे, सर्वनामे, विशेषणे आणि अव्यये यांना प्रत्यय लावून किंवा धातू खेरीज इतर शब्दांना प्रत्यय लागून जे शब्द तयार होतात ते शब्द साधिते किंवा तद्धिते, नामसाधिते होत.
(१) संस्कृत प्रत्यय :
(अ, इक, आत ईन, ईत, कीय, त्व, मान, वान)
उदा.
अ - यादव, राघव, पांडव, भार्गव, सौभद्र,
इक - वाचिक, मानसिक, मासिक, लौकिक, धार्मिक,
इत - आनंदित, दुःखित, मूर्च्छित, उत्कंठित.
ईन - कुलीन, शालीन, नवीन,
कीय - परकीय, राजकीय, स्वकीय.
त्व - महत्त्व, विद्वत्व, जडत्व, मूर्खत्व, गुरुत्व,
मान - बुद्धिमान, श्रीमान
वान - बागवान, धनवान, विद्वान
(२) मराठी प्रत्यय :
(अ, आई, ई, कर, करी, कट, की, खोर, वाईक, सर)
उदा.
तऱ्हेवाईक, मासलेवाईक, चेष्टेखोर, पाटीलकी, शेतकी, गावकी, मळकट, पोरकट, वारकरी, पहारेकरी, दिनकर, प्रभाकर, दांडगाई, शिष्टाई, खोदाई, गारठा, ओढा ओलसर, भोळसर.
अ - वेडा, ठेवा, ठेचा, भरडा,
आई - शिलाई, लढाई, विटाई,
ई - उडी, बुडी, बोली, चोरी, सावकारी,
ई - मापी, वजनी, लाकडी, पितळी.
कर - सुखकर, खेळकर, खोडकर,
करी - शेतकरी, देणेकरी, भाडेकरी,
कट - तेलकट, मातकट, धुरकट,
की - माणुसकी, उनाडकी,
खोर - भांडखोर, चिडखोर, चहाडखोर,
वाईक - नातेवाईक, आस्थेवाईक,
सर - गोडसर, वेडसर, काळसर,
(३) फारसी प्रत्यय :
(गर, गार, ई, स्तान, गिरी, दार, दान बाज, बंद, खाना, नवीस, णीस, आबाद, नामा)
उदा.
चिरेबंद, नफेबाज,दगलबाज, पोतदार, इमानदार, अबूदार, धारदार, घाटदार, डौलदार, हमाली, फकिरी, माहितगार, कामगार, दाणी, पिकदाणी, चहादाणी हत्तीखाना, दारुखाना.
गर - सौदागर, जिनगर
गार - जादूगार, गुन्हेगार,
ई - खुशी, मजुरी, नेकी,
स्तान - अरबस्तान, तुर्कस्तान, कबरस्तान.
गिरी - गुलामगिरी, मुलुखगिरी, कारागिरी.
दार - दुकानदार, फौजदार, जमीनदार,
दान - कलमदान, शामदान, अत्तरदाणी,
बाज - दारूबाज, नखरेबाज, कुर्रेबाज,
बंद - नालबंद, पगडबंद, हत्यारबंद,
खाना - कारखाना, तोफखाना, दवाखाना.
नवीस - चिटनवीस, फडनवीस, कारखानवीस,
नीस - चिटणीस, फडणीस.
आबाद - औरंगाबाद, हैदराबाद, अहमदाबाद.
नामा - हुकुमनामा, करारनामा, पंचनामा, जाहीरनामा.
(इ) अभ्यस्त शब्द :-
(१) पूर्णाभ्यस्त शब्द
निरनिराळ्या शब्दांच्या जातींचा एकच पूर्ण शब्द द्विरुक्त होतो म्हणजे दोनदा येतो.
उदा.
तिळतिळ, हालहाल, तुकडेतुकडे, कोणीकोणी, एकेक, हळूहळू, पुढेपुढे, मागोमाग, हायहाय.
कित्येक वेळा या द्विरुक्त शब्दांच्या मागे च, चे, च्या, ल्या, अशांसारखे प्रत्यय येऊन अतिशयत्व, सूचित केलेले असते.
उदा.
पैसाचपैसा, लांबचलांब, वरचेवर, वरच्यावर, वरल्यावर, मधल्यामधे, खालच्याखाली, आतल्या आत.
(२) अंशाभ्यस्त शब्द
जेव्हा शब्द तसाच पुन्हा न येता त्यातील एखादे अक्षर बदलून केवळ निरर्थक अक्षरे वापरून यमक साधण्याचा प्रयत्न असतो.
उदा. -
शेजारीपाजारी, झाडबीड, बारीकसारीक, उरलासुरला, आडवातिडवा, अर्घामुर्धा, अघळपघळ, दगडबिगड, गोडधोड, किडूकमिडूक, घरबीर, उद्याबिद्या.
केव्हा केव्हा पहिल्या नामाच्या अर्थाचेच दुसरे नाम जोडून द्विरुक्ती होते. हा शब्द समानार्थक शब्दांचा समास असतो.
उदा. कागदपत्र, कामकाज, कपडालत्ता, बाजारहाट, साजशृंगार, बाडबिस्तरा.
समानार्थक शब्दांत विशिष्ट भाषा समावेश असतो
उदा.
(१) (फार्शी + फार्शी)
अक्कलहुशारी, डावपेच, जुलूमजबरी.
(२) (फार्शी मराठी)
अंमलबजावणी, कागदपत्र, खर्चवेच, मेवामिठाई, बाजारहाट
(३) (मराठी + फार्शी)
दंगामस्ती, थट्टामस्करी, धनदौलत, मानमरातब, रीतरिवाज
(३) अनुकरणवाचक शब्द
काही शब्दांत एखाद्या ध्वनिवाचक शब्दाची पुनरुक्ती साधलेली असते.
उदा.
बडबड, किरकीर, गुटगुटीत, कडकडाट, गडगडाट, फडफड, खदखदून, तुरुतुरू, लुट्लट्, चुटचुट, गडगड, वटवट.