पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा:
१ भारताच्या प्राचीन काळातील इतिहासलेखना विषयाची माहिती लिहा.
१ प्राचीन भारतामध्ये पूर्वजांचे पराक्रम, दैवतपरंपरा, सामाजिक स्थित्यंतरे इत्यादींच्या स्मृती केवळ मौखिक परंपरेने जपल्या जात होत्या.
२ हडप्पा संस्कृतीमध्ये मिळालेल्या प्राचीन लेखांच्या आधारे भारतामध्ये लेखनकला इसवी सना पूर्वी तिसऱ्या सहस्रकापासून किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होती.
३ भारतातील ऐतिहासिक स्वरूपाचे सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य हे कोरीव लेखांच्या स्वरूपातील मौर्य सम्राट अशोकाच्या काळापासून म्हणजे इसवी सनापूर्वी तिसऱ्या शतकातील आहे.
४ सम्राट अशोकाचे कोरीव लेख हे प्रस्तरांवर आणि दगडी स्तंभांवर कोरलेले आहेत.
५ इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून धातूची नाणी, मूर्ती आणि शिल्पे, ताम्रपट इत्यादींवरील कोरीव लेख उपलब्ध आहे
यांमधून महत्त्वाची ऐतिहासिक माहिती मिळते.
६ या सर्व प्रकारच्या कोरीव लेखांमुळे संबंधित राजाचा काळ, वंशावळ, राज्यविस्तार, तत्कालीन शासनव्यवस्था, महत्त्वाच्या राजकीय घडामोडी, तत्कालीन सामाजिक रचना, हवामान, दुष्काळ यांसारख्या महत्त्वाच्या बाबींची माहिती मिळते.
७ प्राचीन भारतीय साहित्यामध्ये रामायण, महाभारत ही महाकाव्ये, पुराणे, जैन आणि बौद्ध ग्रंथ, धर्मग्रंथांखेरीज भारतीय ग्रंथकारांनी लिहिलेले ऐतिहासिक स्वरूपाचे साहित्य तसेच परकीय प्रवाशांची प्रवासवर्णने ही इतिहासलेखनाची महत्त्वाची साधने आहेत.
८ प्राचीन काळातील राजांची चरित्रे तसेच राजघराण्यांचे इतिहास सांगणारे लेखन हे भारतीय इतिहासलेखनाच्या वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे आहेत.
९ इसवी सनाच्या सातव्या शतकात कवी
बाणभट्टने लिहिलेले ‘हर्षचरित’ हे संस्कृत काव्य ऐतिहासिक चरित्रग्रंथाच्या स्वरूपाचे आहे. त्यामध्ये तत्कालीन
सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचे वास्तववादी चित्रण केलेले आहे.
२ आधुनिक इतिहासलेखन पद्धतीची वैशिष्ट्ये कोणती?
आधुनिक इतिहासलेखनाच्या पद्धतीची चार प्रमुख वैशिष्ट्ये सांगितली जातात :
१ ही पद्धती शास्त्रशुद्ध आहे. तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणीने होते.
२ हे प्रश्न मानवकेंद्रित असतात. म्हणजे भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतींसंबंधी असतात. इतिहासात त्या कृतींचा संबंध दैवी घटना किंवा देवदेवतांच्या कथाकहाण्यांशी जोडण्याचा प्रयत्न केलेला नसतो.
३ या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो. त्यामुळे इतिहासाची मांडणी तर्कसुसंगत असते.
४ मानवजातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो.
३ वंचितांच्या इतिहासातील फुले-आंबेडकर यांचे कार्य स्पष्ट करा.
१ वंचितांचा इतिहास लिहिण्यासाठी लोकपरंपरा ह एक महत्त्वाचे साधन मानले गेले आहे.
२ भारतामध्ये वंचितांच्या इतिहासाचा विचार महात्मा जोतीराव फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनातून मांडलला.
३ महात्मा फुले यांनी ‘गुलामगिरी’ या पुस्तकात शूद्रातिशूद्रांचा इतिहास नव्याने उलगडून दाखवला.
४ धर्माच्या नावाखाली स्त्रिया, शूद्र व अतिशूद्र यांच्या होणाऱ्या शोषणाकडे लक्ष वेधले.
५ भारताच्या सांस्कृतिक आणि राजकीय घडणीत दलित वर्गाचा मोठा वाटा आहे. भारताच्या वसाहतवादी आणि राष्ट्रवादी इतिहासलेखनात त्याकडे दुर्लक्ष झाले. ही गोष्ट केंद्रस्थानी ठेवून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सतत लेखन केले.
६ त्यांनी केलेल्या विपुल लेखनापैकी ‘हू वेअर द शूद्राज’ आणि ‘द अनटचेबल्स्’ हे ग्रंथ वंचितांच्या इतिहासाचे उदाहरणे आहेत.
४ अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात कोणती कामे महत्त्वाची आहेत?
१ भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत असलेले एक खाते अभिलेखागारांचे व्यवस्थापन हे तांत्रिकदृष्ट्या ग्रंथालय व्यवस्थापनाचेच एक अंग असते.
२ महत्त्वाच्या
नोंदी असलेली कागदपत्रे त्यांमध्ये कोणताही बदल न करता सुरक्षित ठेवणे.
३ महत्त्वाच्या नोंदी असलेली कागदपत्रां च्या सूची तयार करणे आणि ती हवी तेव्हा उपलब्ध करून देणे.
४ महत्त्वाच्या नोंदी असलेली कागदपत्रे क्रमवार लावून ठेवणे त्यामध्ये इंग्रजी, अरबी, हिंदी, फारसी, संस्कृत, उर्दू या भाषा आणि मोडी लिपीतील नोंदींचा समावेश करणे.
५ महत्त्वाच्या नोंदींची वर्गवारी सार्वजनिक, प्राच्यविद्याविषयक, हस्तलिखिते आणि खासगी कागदपत्रे अशा चार प्रकारांत करणे.
६ संगणकीय प्रणालींच्या उपयोगामुळे अभिलेखागार यांचे आधुनिक काळातील व्यवस्थापन अपरिहार्यपणे माहिती तंत्रज्ञानाशी जोडणे.
५ वृत्तपत्रे व
नियतकालिके यांतील फरक स्पष्ट करा.
१ ठरलेल्या वेळी नियमितपणे छापून वितरित केले जाणारे प्रकाशन म्हणजे ‘वर्तमानपत्र’ होय.
२ ठरावीक कालावधीत प्रकाशित होणारे मुद्रित साहित्य म्हणजे ‘नियतकालिक’ होय.
३ वर्तमानपत्रात मुख्यतः बातम्या, अग्रलेख, लोकांची मते, जाहिराती, रंजक व अन्य पूरक मजकूर यांचा समावेश होतो.
४ नियतकालिकात साप्ताहिक, पाक्षिक, मासिक, द्वैमासिक, त्रैमासिक, षाण्मासिक, वार्षिक यांचा समावेश होतो.
५ वर्तमानपत्रे स्थानिक, देशांतर्गत व जागतिक स्वरूपाच्या विविध बातम्या पुरवण्याचे काम करतात.
६ कार्ल मार्क्स यांचा वर्गसिद्धान्त स्पष्ट करा.
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्स याने मांडलेल्या सिद्धान्तांमुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा बदल घडवून आणणारी वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली.
कार्ल मार्क्स यांचा वर्गसिद्धान्त:
१ इतिहास हा
अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो.
२ माणसामाणसांमधील नातेसंबंध त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर अवलंबून असतात.
३ समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत. त्यातून समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्गसंघर्ष निर्माण होतो.
४ कार्ल मानवी इतिहास अशा वर्गसंघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने असतात तो इतर वर्गांचे आर्थिक शोषण करतो, अशी मांडणी त्याने केली.
७ लिओपॉल्ड व्हॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा.
१ एकोणिसाव्या शतकातील इतिहासलेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठातील लिओपॉल्ड व्हॉन रांके याच्या विचारांचा प्रभाव होता.
२ इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी ते सांगितले.
३ मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्त्वाची आहे, यावर त्याने भर दिला.
४ ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्याने सांगितले.
५ इतिहासलेखनातील
काल्पनिकतेवर त्याने टीका केली. त्याने जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दिला.
६‘द थिअरी अँड प्रॅक्टिस आॅफ हिस्टरी’ आणि ‘द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्टरी’ या ग्रंथांमध्ये त्याच्या विविध लेखांचे संकलन आहे.
८ वाढत्या पर्यटनाचे होणारे फायदे स्पष्ट करा.
१ व्यावसायिक पद्धतीने लक्ष दिले तर पर्यटन हा सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा, एक कायमस्वरूपी व्यवसाय आणि नावीन्यपूर्ण प्रयोग करण्यास प्रचंड संधी यात आहेत.
२ परदेशी पर्यटकाने विमानतळावर पाऊल ठेवण्याआधीपासून तो भेट देणाऱ्या देशाला उत्पन्न मिळवून देण्यास सुरुवात करतो. त्याने भरलेल्या व्हिसा फीमुळे आपल्या देशाला महसूल मिळतो.
३ प्रवासखर्च, हॉटेलमध्ये राहणे, खाणे, दुभाष्याची मदत घेणे, वर्तमानपत्रे, संदर्भ साहित्य विकत घेणे, आठवण म्हणून स्थानिक वस्तूविकत घेणे एवढ्या गोष्टी पर्यटक मायदेशी जाईपर्यंत करतो यामुळे अनेक लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतात.
४ पर्यटन केंद्रांच्या परिसरात बाजारपेठांचा विस्तार होतो. तेथील हस्तोद्योग व कुटीरोद्योग यांचा विकास होतो. त्या वस्तूंच्या खरेदी-विक्रीत वाढ होते.
५ स्थानिक खाद्यपदार्थ, तेथील हस्तकौशल्याच्या वस्तू इत्यादी गोष्टी पर्यटक आवडीने खरेदी करतात. त्यामुळे स्थानिकांच्या रोजगारात वाढ होते.
९ इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा.
इतिहासलेखन, भाषाशास्त्र, व्युत्प्त्तीशास्र आणि
व्याकरण अशा अनेक विषयांवर मूलभूत संशोधन करणारे आणि मराठी भाषेतून लेखन करणारे ‘इतिहासाचार्य’ म्हणून राजवाडे परिचित आहेत.
त्यांचे योगदान पुढील प्रमाणे:
१ ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने’ असे शीर्षक असणारे २२ खंड त्यांनी संपादित केले.
२ आपला इतिहास आपण लिहिला पाहिजे, याचा पुरस्कार त्यांनी केला.
३ इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन होय
असा विचार त्यांनी मांडला.
४ केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरासाठी केलेली कटकारस्थाने आणि युद्धे यांच्याच हकिकती नव्हेत असे
त्यांचे मत
होते.
५ अस्सल कागदपत्रांच्याच आधारे मानवी इतिहास काल व स्थल यांनी बद्ध झालेला आहे असा
विचार त्यांनी मांडला.
६ काल, स्थल व व्यक्ती या त्रयीची जी सांगड तिलाच प्रसंग वा ऐतिहासिक प्रसंग ही संज्ञा देता येते.
इतिहासाचार्य राजवाडे यांचे ऐतिहासिक लेखन व
इतिहास लेखनावर त्यांनी मांडलेले विचार हे
इतिहासलेखनासाठी मोलाचे योगदान आहे.
१० हेगेल याने इतिहासाच्या संदर्भात मांडलेले विचार स्पष्ट करा.
१ हेगेल या जर्मन तत्त्वज्ञाने ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे यावर भर दिला.
२ इतिहासातील घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो. त्याचबरोबर इतिहासाची मांडणी इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यांनुसार बदलत जाणे स्वाभाविक असते, असे प्रतिपादन त्याने केले.
३ त्याच्या विवेचनामुळे इतिहासाच्या अभ्यासपद्धती विज्ञानाच्या पद्धतींपेक्षा वेगळ्या असल्या तरी त्या कमी प्रतीच्या नाहीत, अशी अनेक तत्त्वज्ञांची खात्री पटली.
४ हेगेलच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी दोन विरोधी प्रकारांत करावी लागते. त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचे आकलन होत नाही. या पद्धतीला ‘द्वंद्ववाद’ (डायलेक्टिक्स्) असे म्हटले जाते.
५ ‘एनसायक्लोपिडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस’ या ग्रंथामध्ये त्याची व्याख्याने आणि लेख यांचे संकलन आहे.
६ हेगेलने लिहिलेले ‘रिझन इन हिस्टरी’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे.
११ भारतीय दूरदर्शनच्या विकासाची वाटचाल थोडक्यात लिहा.
१ दूरदर्शन हे
दृक्-श्राव्य माध्यम असल्याने जनतेला एखाद्या घटनेचा ‘प्रत्यक्ष काय घडले’ हे ‘आँखो देखा हाल’ पाहण्यासाठी दूरदर्शनला पर्याय नाही.
२ भारतात १५ सप्टेंबर १९५९ रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्रप्रसाद यांनी ‘दिल्ली दूरदर्शन केंद्रा’चे उद्घाटन केले.
३ महाराष्ट्रात १ मे १९७२ रोजी मुंबई केंद्राचे कार्यक्रम सुरू झाले.
४ १५ ऑगस्ट १९८२ या दिवशी रंगीत दूरदर्शनचे आगमन झाले.
५ १९९१ मध्ये परदेशी व देशी खासगी वाहिन्यांना केबल तंत्राच्या माध्यमातून कार्यक्रम प्रसारित करण्याची परवानगी दिली गेली.
६ आजमितीला भारतीय प्रेक्षकांसाठी १००० हून अधिक वाहिन्या उपलब्ध आहेत.
१२ राष्ट्रवादी इतिहास लेखनात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान कोणते?
१ भारतीयांनी ब्रिटिशांविरुद्ध दिलेल्या स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रवादी इतिहासलेखनाचा उपयोग झाला.
२ त्यामध्ये स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकरांनी लिहिलेले ‘द इंडियन वॉर ऑफ इन्डिपेन्डन्स 1857’ (१८५७ चे ‘स्वातंत्र्यसमर’) या पुस्तकाचे विशेष महत्त्व आहे.
३ राष्ट्रवादी इतिहासलेखनाच्या प्रभावामुळे प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली.
४ दक्षिण भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांकडे आणि इतिहासाकडे इतिहासकारांचे स्वतंत्रपणे लक्ष वेधले गेल.
१३'स्थानिक पर्यटन' आणि
'आंतरराष्ट्रीय पर्यटन' यांतील फरक
स्पष्ट करा.
१ स्थानिक पर्यटन हा प्रवास सुलभ असतो. तो देशातल्या देशात असल्याने यात भाषा, चलन, कागदपत्रे यांचा फारसा अडथळा नसतो.
२ आंतरराष्ट्रीय पर्यटन एका देशातून
दुसऱ्या देशात केला
जात असल्याने यात भाषा, चलन, कागदपत्रे यांचा अडथळा असतो.
३ स्थानिक पर्यटन हा
विशेष म्हणजे आपल्याला उपलब्ध असलेल्या वेळेप्रमाणे आपण त्याचे नियोजन करू शकतो.
४ आंतरराष्ट्रीय पर्यटन हा पूर्वनियोजन
करूनच आपल्याला वेळेप्रमाणे आपण त्याचे नियोजन करू शकतो.
५ स्थानिक पर्यटन रस्ते, रेल्वे आणि विमान यांच्या सहय्याने
प्रवास कर्ता येतो.
जहाज, रेल्वे आणि विमान यांच्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटन करणे पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे.
१४ उपयोजित इतिहासाचा वर्तमानकाळाशी कसा
सहसंबंध असतो?
१ भूतकाळातील घटनांसंबंधींचे जे ज्ञान इतिहासाद्वारे प्राप्त होते, त्याचा उपयोग वर्तमान आणि भविष्यकाळात सर्व लोकांना कसा होईल, याचा विचार उपयोजित इतिहास या विषयाद्वारे केला जातो.
२ वर्तमानातील सामाजिक आव्हानांवर उपाययोजना करणे, सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय घेणे यांसारख्या गोष्टींसाठी पूर्वी होऊन गेलेल्या घटनांचे विश्लेषण दिशादर्शक ठरते. त्यासाठी इतिहासाचे ज्ञान आवश्यक असते.
३ भूतकाळाचे मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील अनेक अवशेष वर्तमानकाळात अस्तित्वात असतात. त्यांच्याबद्दल मनात कुतूहल असते, आत्मीयता असते आणि
त्यांच्या अस्तित्वाचा इतिहास समजावून घेण्याचे कुतूहल निर्माण होते.
४ पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृतींचे, परंपरांचे अवशेष, तो सांस्कृतिक वारसा या
इतिहासाचे ज्ञान पुढील पिढ्यांच्या हितासाठी दीर्घकाळ जतन व
त्याचे संवर्धन करण्याची आवश्यकता निर्माण होते.
५ उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रात केवळ तज्ज्ञ व्यक्तींचाच नव्हे तर सर्वसामान्य लोकांचा विविध अंगांनी सहभाग असू शकतो.
६ संग्रहालये, प्राचीन स्थळे यांना भेट देणारे पर्यटक या नात्याने त्यांचा सहभाग महत्त्वाचा असतो. पर्यटनामुळे लोकांमध्ये इतिहासासंबंधीची आवड वाढीस लागते.
७ समाज मनामध्ये इतिहासाची जाणीव निर्माण होते. तसेच त्यांच्या स्वतःच्या शहरात किंवा गावात असणाऱ्या प्राचीन स्थळांच्या जतन आणि संवर्धनाच्या प्रकल्पांमध्येही ते सहभागी होतात.
८ उपयोजित इतिहासाच्या आधारे मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करता येते.