बुधवार, ३० मार्च, २०२२

इयत्ता १० वी इतिहास थोडक्यात टिपा लिहा

 थोडक्यात टिपा लिहा :


१ कार्ल मार्क्स:

१ एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्सने  त्याचादास कॅपिटलया जगप्रसिद्ध ग्रंथात वर्गसंघर्षाचा सिद्धान्त मांडला.

२ कार्ल मार्क्स याने मांडलेल्या सिद्धान्तांमुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा बदल घडवून आणणारी साम्यवादी वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली.

३ इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. असे त्याचे मत होते.

४ मानवी इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने असतात तो इतर वर्गांचे आर्थिक शोषण करतो, अशी मांडणी त्याने केली.


२ लिओपाॅल्ड व्हॅन रांके

१ एकोणिसाव्या शतकातील इतिहासलेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठातील लिओपॉल्ड व्हॉन रांके याच्या विचारांचा प्रभाव होता.

२ त्याने इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी ते सांगितले.

३ मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्त्वाची आहे, यावर त्याने भर दिला.

४ इतिहासलेखनातील काल्पनिकतेवर त्याने टीका केली.

५ ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्याने सांगितले.

६ ‘ थिअरी अँड प्रॅक्टिस आॅफ हिस्टरी आणि सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्टरीया ग्रंथांमध्ये त्याच्या विविध लेखांचे संकलन आहे.


३ जेम्स ग्रँट डफ

१ जेम्स ग्रँट डफ या ब्रिटिश अधिकाऱ्यांने मराठी साम्राज्याचा इतिहास हिस्टरी ऑफ मराठाज्हा ग्रंथ तीन खंडात लिहिला.

२ भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखण्याच ब्रिटिश अधिकाऱ्यांची प्रवृत्ती ग्रँट डफ याच्या लेखनातही उमटलेली दिसते.

३ डफ याच्या इतिहासलेखनाच्या मर्यादा नीलकंठ जनार्दन कीर्तने आणि वि.  का.  राजवाडे यांनी एकोणिसाव्या शतकात दाखवून दिल्या.


४ वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य,

१ वर्तमानपत्रांनी समाजप्रबोधनाचे महत्त्वाचे कार्य केले.

२ राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास भारतीय जनते पर्यंत पोहचवला.

३ तत्कालीन, सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडली.

४ साम्राज्यवादी धोरणांना विरोध करून राजकीय चळवळीना पाठींबा दिला.

५ एकविसाव्या शतकात वर्तमानपत्रे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.


५ प्रसार माध्यमांची आवश्यकता

१ माहितीचा मुक्त प्रवाह समाजात पसरवण्यासाठी प्रसारमाध्यमांची आवश्यकता असते.

२ दूरदर्शन हे दृक्-श्राव्य माध्यमाने जनतेलाप्रत्यक्ष काय घडलेहे दाखवायला सुरुवात केली. जनतेला एखाद्या घटनेचाआँखो देखा हालपाहण्यासाठी दूरदर्शनला पर्याय नाही.

३ सर्व वयातील व्यवसायातील नागरिकांना प्रगती आवश्यक असलेली माहिती देशाच्या कानाकोपऱ्यात पोचवली जाते.

४ प्रसारमाध्यमाने मनोरंजन केले जाते.

५ लोकशाही अधिक सुदृढ होण्यास वर्तमानपत्रे मदत करू शकतात.


६ प्रसारमध्यमाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे

१ वृत्त पत्रात लेख, अग्रलेख, लिहिणारे लेखक संपादकाची आवश्यकता असते.

२ बातम्या जमा करणारे वार्ताहर तंत्रज्ञ यांची आवश्यकता असते

३ माध्यमात कार्यक्रम सादर करणारे तंत्रज्ञ, निवेदक, कलाकार सहकालाकारंची आवश्यकता असते.

४ माध्यमातून सादर केलेले जाणारे लेख, कार्यक्रम, चर्चा इतिहासाशी निगडीत असल्यास इतिहास तज्ञांची आवश्यकता असते.

 

७ दूरदर्शन 

१ दूरदर्शन हे दृक श्राव्य मध्यम असल्याने ते अत्यत प्रभावी आहे

२ दूरदर्शन हे मनोरंजनाचे लोक प्रसिद्ध साधन आहे यात माहित ऐकता ऐकता चित्रे ही पाहता येतात.  

३ दूरदर्शनवर सामाजिक, राजकीय, आर्थिक यासारख्या विविध विषयावर चर्चा, मनोरंजनाचे कार्यक्रम, खेळ असे विविध कार्यक्रम घर बसल्या पाहता येतात.

४ दूरदर्शनचे बदलत जाणारे स्वरूप रंगीत संच, रीमोटचा वापर, घटनांचे प्रत्यक्ष प्रसारण यांमुळे लोकप्रियता आजून वाढतच आहे. 


८ मार्को पोलो

१ तेराव्या शतकातील मार्को पोलो या इटालियन प्रवासी.

२ त्याने आशिया खंड आणि विशेषतः चीनची ओळख युरोपला करून दिली, तो १७ वर्षे चीनमध्ये राहिला.

३ आशियातील निसर्ग, समाजजीवन, सांस्कृतिक जीवन आणि व्यापार यांची ओळख त्याने जगाला करून दिलीयातूनच युरोप आशिया यांच्यात संवाद व्यापार सुरू झाला.

 

९ स्थलकोश:

१ इतिहासाच्या अभ्यासासाठी भूगोल महत्त्वाचा आहे. विविध ऐतिहासिक स्थळांच्या संदर्भांत माहिती देणारे कोश आहेत.

२ महानुभाव पंथातील मुनी व्यास यांनी रचलेला स्थानपोथी (१४ वे शतक) या ग्रंथात महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्रीचक्रधर स्वामी ज्या-ज्या गावी गेले त्या गावांची तपशीलवार नोंद आहे. तत्कालीन महाराष्ट्राची कल्पना या ग्रंथावरून येते.

३ लीळाचरित्रातील विविध घटना केव्हा, कोणत्या स्थळी कोणत्या प्रसंगाने घडल्या हेही स्थानपोथीकार सांगतात. त्यामुळे श्रीचक्रधरस्वामींच्या चरित्रलेखनासाठी हा उत्तम संदर्भग्रंथ आहे.

४ सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांनी प्राचीन भारतीय स्थलकोशया कोशाची रचना केली आहे.

५ वैदिक साहित्य, कौटिलीय अर्थशास्त्र, पाणिनीचे व्याकरण, वाल्मीकी-रामायण, महाभारत, पुराणे, मध्ययुगीन संस्कृत आणि शब्दकोश साहित्य, तसेच फार्सी, जैन, बौद्ध, ग्रीक आणि चिनी साहित्य यांमधील भौगोलिक स्थळांची माहिती कोशात दिली आहे.


१० विश्वकोश.

१ विश्वकोशात जगभरातील ज्ञान साररूपाने या कोशांमध्ये नोंदले आहे.

२ विश्वकोशातील माहिती ही संशोधनपूर्ण नोंद केलेल्या असल्याने विश्वासार्ह् असते म्हणून विश्वकोश हे ज्ञानप्रसाराचे साधन मानले जाते.  

३ विश्वकोशाचे दोन भाग पडतात.

) सर्वसंग्राहक (उदा., एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका, महाराष्ट्रीय ज्ञानकोश, मराठी विश्वकोश इत्यादी)

) विशिष्ट विषयपर कोश - हे एखाद्या विषयाला वाहून घेतलेले कोश असतात. उदा., भारतीय संस्कृती कोश, व्यायाम ज्ञानकोश इत्यादी.


११ भारतातील संग्रहालये (इंडियन म्युझियम):

१ कोलकाता येथीलभारतीय संग्रहालयहे भारतातील पहिले संग्रहालयएशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलया संस्थेतर्फे इसवी सन १८१४ मध्ये स्थापन झाले.

२ प्रकाशन, छायाचित्रण, प्रदर्शन, जतन संवर्धन, ग्रंथालय अशा विविध विभागामार्फत काम चालते.

३ भारतातील प्रसिद्ध संग्रहालये: इंडियन म्युझियम कोलकाता, नॅशनल म्युझियम दिल्ली, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय मुंबई, सालारजंग म्युझियम हैदराबाद, कॅलिको म्युझियम ऑफ टेक्स्टाइल्स अहमदाबाद ही भारतातील प्रसिद्ध संग्रहालयांपैकी काही आहेत.


१२ खेळ आणि चित्रपट

१ खेळ या विषयाला वाहून घेतलेल्या दूरदर्शन वाहिन्या आहेत.

२ अलीकडच्या काळातखेळआणि खेळाडूंचा जीवनपट यांवर काही हिंदी इंग्लिश चित्रपटांची निर्मिती झाली आहे. उदा., मिल्खासिंग, महेंद्रसिंग धोनी, सचिन तेंडूलकर, मेरी कोम आणि दंगल.

३ चित्रपट बनवताना चित्रपटाचा कालखंड, त्या काळातील भाषा, पेहराव, सामान्य जनजीवन या सगळ्यांची सखोल माहिती मिळते


१३ सरस्वती महाल ग्रंथालय:

१ तमिळनाडूतील तंजावर येथीलसरस्वती महाल ग्रंथालयहे इसवी सनाच्या सोळाव्या- सतराव्या शतकातील नायक राजांच्या काळात बांधले गेले.

२ व्यंकोजीराजे भोसले आणि त्यांच्या वंशंजांनी सरस्वती महाल ग्रंथालय अधिकाधिक समृद्ध केले. त्यांमध्ये सरफोजीराजे भोसले यांचा महत्त्वाचा वाटा होता.

३ त्यांच्या सन्मानार्थ इसवी सन १९१८ मध्ये या ग्रंथालयाला त्यांचे नाव देण्यात आले.

४ या ग्रंथालयाच्या संग्रहात सुमारे एकोणपन्नास हजार ग्रंथ आहेत.

मंगळवार, २९ मार्च, २०२२

इयत्ता १० वी, इतिहास, पुढील संकल्पना स्पष्ट करा

 पुढील संकल्पना स्पष्ट करा:

१. द्वंद्ववाद

१. जॉर्ज हेगेल यांनी द्वंद्ववाद पद्धतीचा सिद्धांत मांडला.

२. कोणत्याही एखाद्या घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी दोन विरोधी प्रकारांत करावी लागते. त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचे आकलन होत नाही. या पद्धतीलाद्वंद्ववाद’ (डायलेक्टिक्स्‌) असे म्हटले जाते.

३. या पद्धतीत प्रथम एक सिद्धान्त मांडला जातो. त्यानंतर त्या सिद्धान्ताला छेद देणारा प्रतिसिद्धान्त मांडला जातो.

४. या पद्धती मध्ये परस्पर विरोधी दोन सिद्धांत माडले जातात त्या दोन्ही सिद्धान्तांच्या तर्काधिष्ठित ऊहापोहानंतर त्या दोहोंचे सार ज्यात सामावलेले आहे अशा सिद्धान्ताची समन्वयात्मक मांडणी केली जाते.

५. उदाहरणार्थ; खरे-खोटे, चांगले-वाईट.

 

२. अॅनल्स प्रणाली

१. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये अॅनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहासलेखनाची प्रणाली उदयाला आली.

२. इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते आणि त्या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्धे यांच्यावर केंद्रित करता तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांसारख्या विषयांचा अभ्यास करणेही महत्त्वाचे मानले जाऊ लागले.

३.अॅनल्स प्रणालीमुळे इतिहासलेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली.


३. उपयोजित इतिहास

१. भूतकाळातील घटनांसंबंधींचे जे ज्ञान इतिहासाद्वारे प्राप्त होते, त्याचा उपयोग वर्तमान आणि भविष्यकाळात सर्व लोकांना कसा होईल, याचा विचार उपयोजित इतिहास या विषयाद्वारे केला जातो.

२. वर्तमानातील सामाजिक आव्हानांवर उपाययोजना करणे, सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय घेणे यांसारख्या गोष्टींसाठी पूर्वी होऊन गेलेल्या घटनांचे विश्लेषण दिशादर्शक ठरते. उपयोजित इतिहास उपयुक्त असतो.

 

४. प्राच्यवादी इतिहासलेखन

१. युरोपमधील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल जागृत झालेले होते. त्या कुतूहलापोटी भारतीय संस्कृती अभ्यास करणाऱ्या युरोपीय अभ्यासकांना प्राच्यवादी म्हटले.

२. या प्राच्यवादी अभ्यासकांनी भारतीय संस्कृती, इतिहास, भारतीय भाषा धर्म यांचा अभ्यास करून इतिहास लेखन केले.

३. प्राच्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपीय भाषांमधील साधर्म्याचा अभ्यास केला. या भाषांची जननी असणारी एक प्राचीन इंडो-युरोपीय भाषा होती, अशी कल्पना मांडली गेली.

४. प्राच्यविद्यावंतांच्या लेखनामागील छुपे साम्राज्यवादी वृत्ती होती त्यादृष्टीने त्यांनी भारताच्या इतिहासाचे लेखन केले.

 

५. राष्ट्रवादी इतिहासलेखन

१. एकोणिसाव्या शतकामध्ये इंग्रजी शिक्षणपद्धती मध्ये शिकून तयार झालेल्या भारतीय इतिहासकारांच्या लेखनामध्ये भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान आणि भारतीयांची आत्मजाणीव जागृत करण्याकडे असलेला कल दिसतो. त्यांच्या लेखनास राष्ट्रवादी इतिहासलेखन असे म्हटले जाते.

२. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या प्राचीन भारताच्या पूर्वग्रहदूषित इतिहासाला त्यांनी विरोध केला.

३. राष्ट्रवादी लेखन करणाऱ्या इतिहासकारांनी भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधण्याचा प्रयत्न केला.

४. भारतीयांनी ब्रिटिशांविरुद्ध दिलेल्या स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रवादी इतिहासलेखनाचा उपयोग झाला.

५. राष्ट्रवादी इतिहासलेखनाच्या प्रभावामुळे प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली.

६. दक्षिण भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांकडे आणि इतिहासाकडे इतिहासकारांचे स्वतंत्रपणे लक्ष वेधले गेले.


६. वंचितांचा इतिहास (सबऑल्टर्न):

१. वंचित समूहांचा इतिहास लिहिण्याची सुरुवात मार्क्सवादी इतिहासलेखनाच्या परंपरेतूनच झाली.

२. इतिहासलेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासून करायला पाहिजे, ही कल्पना इटालियन अँटोनिओ ग्रामची याने  मांडली.

३. वंचितांचा इतिहास लिहिण्यासाठी लोकपरंपरा एक महत्त्वाचे साधन मानले गेले आहे.

४. वंचितांच्या इतिहासाला एक महत्त्वाची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचे महत्त्वाचे कार्य रणजित गुहा या भारतीय इतिहासकाराने केले.

५. महात्मा फुले यांनीगुलामगिरीया पुस्तकात शूद्रातिशूद्रांचा इतिहास नव्याने उलगडून दाखवला.

६. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या विपुल लेखनापैकीहू वेअर शूद्राजआणि अनटचेबल्स्हे ग्रंथ वंचितांच्या इतिहासाचे उदाहरण म्हणून सांगता येतात.

 

७. नैसर्गिक वारसा:

१. निसर्गातील जैववैविध्याचा विचार नैसर्गिक वारसाच्या संकल्पनेत केलेला आहे.

२. नैसर्गिक वारसामध्ये प्राणी, वनस्पतीसृष्टी, त्यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणाऱ्या परिसंस्था आणि भूरचनात्मक वैशिष्ट्ये गोष्टींचा समावेश होतो.

३. भारतातील नैसर्गिक स्थळे अभयारण्य, उद्याने, पर्वतरांगा, नद्या, खोरी, तलाव, धरणे समुद्र किनारे हा नैसर्गिक वारा आहे.

४. उदाहरण: पश्चिम घाट, सातारा जिल्ह्यातील कास पठार.

 

८. वेब पत्रकारिता

१. आधुनिक काळात संगणक महाजाल यांचा उपयोग पत्रकारिता क्षेत्रात केला जातो, या माध्यमातून केल्या जाणाऱ्या पत्रकारितेसवेब पत्रकारिताअसे म्हणतात.

२. अत्याधुनिक नियतकालिकांमध्येवेब पत्रकारिताप्रकारात प्रसिद्ध होणाऱ्य नियतकालिकांचा समावेश होतो.

३. वेब न्यूज पोर्टल्स, सोशल मिडिया, वेब चॅनेल्स, यू ट्यूब यांवर इंग्रजी आणि भारतीय भाषांमधून वाचक आणि प्रेक्षकांसाठी मजकूर उपलब्ध करून दिला जातो.

४. वेब पत्रिका सोशल मीडिया यांमार्फत पुरवली जाणारी बातमी माहिती तपासून खात्री करून घेणे आवश्यक आहे.

 

९. वारसा मुशाफिरी 

१. ऐतिहासिक वारसास्थळाला भेट देण्यासाठी जाणे यालाहेरिटेज वॉकअसे म्हणतात.

२. जेथे इतिहास घडला तेथे प्रत्यक्ष जाऊन इतिहास जाणून घेणे ही अनुभूती हेरिटेज वॉकमध्ये येते.

३. ऐतिहासिक वास्तू जतन करणे, त्याची माहिती जमवणे आणि ती जगभर विविध माध्यमातून पोहचणे इत्यादी उपक्रम चालवले जातात.

४. महाराष्ट्रात मुंबई-पुणे इत्यादी शहरांमध्ये या उपक्रमांचे आयोजन केले जाते.

५. गुजरातमधील अहमदाबाद शहरातील हेरिटेज वॉक प्रसिद्ध आहे.

 

१० कोश

१. कोश म्हणजे शब्दांचा, विविध माहितीचा वा ज्ञानाचा केलेला पद्धतशीर संग्रह.

२. विविध ज्ञानाचे विशिष्ट पद्धतीने केलेले संकलन आणि मांडणी म्हणजे कोश.

३. समाजाची बौद्‌धिक वा सांस्कृतिक गरज ज्या-ज्या प्रकारची असेल, त्या प्रकारच्या कोशवाङ्मयाची निर्मिती त्या-त्या समाजात होते.

४. कोशातील माहितीच्या मांडणीकरिता अचूकपणा, नेमकेपणा, वस्तुनिष्ठता, बांधीवपणा आणि अद्ययावतता या गोष्टी आवश्यक असतात.

५. कोशरचना करताना वाचकाची सोय आणि माहिती शोधण्याची सोय या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात.

६. कोशवाङ्मय राष्ट्राच्या सांस्कृतिक अवस्थेचे प्रतीक आहे.

७. कोशांचे सर्वसाधारणपणे चार विभागांत वर्गीकरण करता येते: () शब्दकोश () विश्वकोश () कोशसदृश वाङ्मय () सूची वाङ्मय  

 

११. अभिलेखागार

१. अभिलेखागारांचे व्यवस्थापन हे तांत्रिकदृष्ट्या ग्रंथालय व्यवस्थापनाचेच एक अंग असते.

२. अभिलेखागारांमध्ये ऐतिहासिक दस्तऐवज व महत्त्वाच्या नोंदी असलेली कागदपत्रे त्यांमध्ये कोणताही बदल करता सुरक्षित ठेवला जातो.

३. अभिलेखागारमुळे मूळ कागदपत्रे हवी तेव्हा संदर्भ म्हणून उपलब्ध होतात. 

४. अभिलेखागारातील कागदपत्रे ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत विश्वासार्ह मानतात त्यामुळे तात्कालिक इतिहास, भाषा, लिपीचा अभ्यास करता येतो. 

५. भारतातील पहिले सरकारी अभिलेखागार इसवी सन १८९१ मध्येइंपिरियल रेकॉर्ड डिपार्टमेंटया नावाने कोलकाता येथे स्थापन झाले

६. भारतातील दिल्ली येथील राष्ट्रीय अभिलेखागार’ हे आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार आहे.

७. महाराष्ट्र राज्य शासनाच्या अभिलेखागार संचालनालयाच्या शाखा मुंबई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद आणि नागपूर येथे आहेत.

८. पुणे अभिलेखागारात मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित सुमारे पाच कोटी मोडी लिपीतील कागदपत्रे आहेत. त्याला पेशवे दप्तर असे म्हणतात.

सामाजिक व राजकीय चळवळी इयत्ता १० वी विषय राज्यशास्त्र

  सामाजिक व राजकीय चळवळी ‘चळवळी’ का ? 1 समाजातल्या सर्वच व्यक्तींना राजकीय पक्षात सहभागी होऊन सार्वजनिक हितासाठी काही करणे शक्य असतेच अस...